नागरिकांनो कोरोना योध्यांच्या कामाची जाणीव ठेवा;काळजी घ्या सुरक्षित रहा!

चांदोरी, (जि. नाशिक) : कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याने कोरोनायोद्धे पुन्हा आठ तास पीपीई किट घालून लढत आहेत. रुग्णांपासून सहकारी डॉक्टर, परिचारिकांना आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून पीपीई किट घालून काम करावे लागते.

को​रोनायोद्धयांच्या मनातही असते भीती!

पीपीई किटने कर्मचाऱ्यांचे संरक्षण होत असले, तरी पीपीई किट घातल्यावर आठ ते नऊ तास पाणीदेखील पिता येत नाही. कुठे बसता येत नाही. शरीर पूर्ण घामाने भिजून जाते. शरीरातील पाणी कमी झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास होतो. काही कर्मचारी चक्कर येऊन पडल्याचेही प्रकार घडले आहेत. आठ तास पीपीई किट घातल्याने हात, पाय पांढरे पडतात. डोळ्यांवर देखील चष्मा असतो. शरीराला थोडीही हवा लागत नाही. अशा स्थितीत कोरोनायोद्धे काम करत असताना आपल्यालाही कोरोना होईल का? आपल्यामुळे घरच्यांना होईल का? ही भीती सतत असते. एक वर्षापासून कोरोना संकट सुरू झाले आहे. तेव्हापासून डॉक्टर, नर्स आणि आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवनमान बदलले आहे. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

 काळजी घ्या, सुरक्षित राहा!

नोव्हेंबरनंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. त्या मुळे काहीसा सुटकेचा नि:श्‍वास कोरोनायोद्ध्यांनी घेतला होता. पण, आता पुन्हा रुग्ण वाढत आहेत. त्या मुळे पुन्हा जीव जोखमीत घालून काम करावे लागत आहे. त्यासाठी नागरिकांनी सुरक्षित राहून काळजी घेतली तर कोरोनायोद्ध्यांना त्रास कमी होईल. 

सहा ते आठ तास पीपीई किट घालून काम करणे खरंच अवघड आहे. परंतु आपल्या सेवेतून रुग्ण लवकर बरा होईल, ही भावना मनात असल्याने होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करतो. 
-तारा जाधव, परिचारिका, जिल्हा रुग्णालय 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

गेल्या वर्षभरात कोरोनासोबत लढताना अनेकांना कवेत घेतले. काहींची झुंज अपयशी ठरली. नागरिकांना मनापासून आवाहन आहे, की स्वतःची काळजी घ्यावी. प्रशासनाने केलेल्या सूचनांचा अवलंब करावा. 
-डॉ. माणिक राऊत, वैद्यकीय अधिकारी, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक