नागरिकांनो, ‘ब्रेक द चेन’ला सहकार्य करा – पालकमंत्री

नाशिक : जिल्ह्यात जीवनावश्यक सुविधा सोडून इतर सर्व दुकाने पुढील २५ दिवसांसाठी बंद राहणार आहेत. ज्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत. त्यातील मोजक्याच सेवा २४ तास सुरू राहतील. बाकी इतर जीवनावश्यक वस्तूंची विक्रीही रात्री आठपर्यंतच सुरू राहणार आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू सुरू आहे म्हणूनही कुणाला फिरता येणार नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ उपक्रमाला नागरिकांनी 
सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

रुग्णांची वाढ कायम 

भुजबळ म्हणाले, की आपण अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तीन दिवसांपासून सगळे अधिकारी सक्रिय झाले आहेत. मात्र त्यानंतरही रुग्‍णसंख्या वाढतच आहे. २४ हजार ९५० हून ३० हजार ४७२ इतकी रुग्णसंख्या झाली आहे. रोज साडेतीन हजाराने रुग्ण वाढत आहेत. होमक्वॉरंटाइन रुग्णांचा प्रश्न कायम आहे. महापालिकेला शिक्के मारण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याला उद्यापासून गती येईल. शहरात दहा दिवसांत रोज १७ ते १८ च्या सरासरीने १६४ मृत्यू झाले आहेत. त्यावर नियंत्रणासाठी शहरात आणखी सुमारे एक हजार २०० वाढीव खाटांची सोय केली जाणार आहे. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

ऑक्सिजनचा टँकर मागविला 

व्हेटिलेंटर बेडविषयी आजही तक्रारी झाल्या. त्या अनुषंगाने ते म्हणाले, की जिल्ह्यात सध्या ६४ टन ऑक्सिजनचा वापर सुरू असून, ही क्षमता ८५ टनापर्यंत आहे. याशिवाय २७ ड्युरा सिलिंडरची सोय करण्याचे नियोजन आहे. एका ड्युरा सिलिंडरमध्ये ३५ जंबो सिलिंडर याप्रमाणे क्षमता असते. ३५० ऑक्सिजन बेडची सोय केली जाणार आहे. तसेच ४६ रुग्णालयांतील ६४६ खाटांची सोय केली जाणार आहे. १०९ व्हेंटिलेटर ४१ आयसीयू कक्षांचे नियोजन सुरू आहे. याशिवाय इतर राज्यांतून ऑक्सिजन मिळविण्याचे प्रयत्न असून, विशाखापट्टणम येथून गॅसचा टँकर मागविला आहे. 

आजपासून शिक्के मारणार 

महापालिकेच्या हद्दीतील कंटेन्मेंट झोन आणि होम क्वारंटाइन रुग्णांच्या बेशिस्तपणावर नियंत्रण आणण्यात अजूनही यश आलेले नसून महापालिकेला बाधित रुग्‍णांच्या हातावर शिक्के मारण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांना 
नाकाबंदीसाठी ५०० गृहक्षक दलाचे जवान उपलब्ध करून दिले जाणार आहेत, असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

- बिटकोत २५० बेड वाढणार 
- ‘मविप्र’त ३०० बेड वाढणार 
- एसएमबीटी ३०० वाढणार 
- संभाजी स्‍टेडियम २०० 
- ठक्कर डोमवर ३०० बेडचे 

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. ५) कोरोनाबाबत आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस उपायुक्त संजय बारकड आदी उपस्थित होते.