नागरिकांनो, मालेगाव कोरोनामुक्त झाल्याचे समजू नका – जिल्हाधिकारी

मालेगाव (नाशिक) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका, आरोग्य विभाग, पोलिस, महसूल आदी विविध विभाग सज्ज आहेत. पुरेशा बेडसह इंजेक्शन, औषधे, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ही तयारी असताना नागरिकांनी बेफिकीर राहू नये आणि मालेगाव कोरोनामुक्त झाल्याचेदेखील समजू नये. मास्क, सुरक्षित अंतर यासह नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी येथे बुधवारी (ता. २५) येथे पत्रकारांशी बोलताना केले.

पहिलीपेक्षा कोरोनाची दुसरी लाट भयानक
 
श्री. मांढरे म्हणाले, की पहिलीपेक्षा कोरोनाची दुसरी लाट भयानक आहे. प्रत्येक नागरिकाने मास्क वापरण्यासह सुरक्षित अंतर ठेवत खबरदारी घ्यावी. विविध विभागांनी गेल्या आठ महिन्यांत अथक परिश्रम घेतल्याने तसेच नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे बाधितांची संख्या नियंत्रणात आली आहे. ही स्थिती बिघडणार नाही याची दक्षता प्रत्येक मालेगावकराला घ्यावी लागणार आहे. 

हेही वाचा > 'आज कुछ तुफानी' करणे चांगलेच भोवले! तब्बल सहा तासांनंतर भावंडांची सुटका 

या वेळी महापालिकेतर्फे कोरोना संक्रमणासंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या. बैठकीला आयुक्त त्र्यंबक कासार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, तुषार आहेर, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे, डॉ. हितेश महाले आदींसह अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा > सोन्याचे बिस्किट हाती लागले पण श्रीमंत होण्याचे स्पप्न भंगले!