नाशिक : केंद्रिय लोकसेवा आयोग (युपीएससी) यांच्यातर्फे नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० च्या तारखांची घोषणा केली आहे. त्यानुसार ही परीक्षा ८ जानेवारी २०२१ पासून देशभरात पार पडणार आहे. दोन सत्रांमध्ये या परीक्षेअंतर्गत विविध विषयांचे पेपर घेतले जातील.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विविध परीक्षांप्रमाणे स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रकदेखील प्रभावित झालेले आहे. यापूर्वी युपीएससीतर्फे काही महिन्यांपूर्वी मुलाखती राहिलेल्या उमेदवारांची प्रक्रिया पूर्ण करून अंतीम निकाल जाहीर केला होता. दुसरीकडे मात्र नागरी सेवा परीक्षा (पूर्व) २०२० ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होऊ शकली नव्हती. मात्र कोरोनाच्या परीस्थितीत सुधारणा होत असतांना, केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत गेल्या ४ ऑक्टोबरला देशभरात ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यातच उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्याच्या अनुषंगाने नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० च्या तारखांची घोषणा युपीएससीतर्फे केली आहे.
हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?
असे असेल वेळापत्रक
वेळापत्रकानुसार ८ जानेवारी २०२१ ला परीक्षेला सुरवात होणार असून, पहिल्या सत्रात सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत पेपर क्रमांक एक पार पडणार आहे. तर ९ जानेवारीला सकाळ सत्रात पेपर क्रमांक दोन, तर याच दिवशी दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेदरम्यान पेपर क्रमांक तीन पार पडणार आहे. १० जानेवारीला सकाळच्या सत्रात पेपर क्रमांक चार, दुपारच्या सत्रात पेपर क्रमांक पाच पार पडणार आहे. १६ आणि १७ जानेवारीला उर्वरित भाषा विषयांचे पेपर पार पडतील.
हेही वाचा > निफाडच्या नगरसेवकाला लाखोंचा गंडा! बाजूने निकाल लावून देण्याच्या बोलीवर उकळले २० लाख