नाट्यक्षेत्राला पुन्हा कोरोनाचा फटका! मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे पुन्हा बंद

नाशिक ः मल्टिप्लेक्स, नाट्यगृहांना गेल्या वर्षी दिवाळीनंतर काही निर्बंधासह परवानगी मिळाली होती. प्रेक्षक कोरोनाचे नियम पाळून मल्टिप्लेक्स, नाट्यगृहांकडे परतले होते. मात्र, महिनाभरापासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करून पुन्हा चित्रपटगृह, नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिरात एप्रिलमध्ये होणाऱ्या व्यावसायिक नाटकांसह एकांकिका महोत्सव, प्रायोगिक नाटक रद्द करावे लागले आहेत. 

व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटके रद्द 

महाकवी कालिदास कलामंदिरात ‘तू म्हणशील तसं’, ‘बारदो’, ‘लवली बाबा’ या नाटकांचे पुढील महिनाभरात प्रयोग होणार होते. रविवारी (ता. ४) ‘दादा, एक गूड न्यूज आहे’ या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग होणार होता. मात्र, अभिनेता उमेश कामत यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे हा प्रयोग आधीच रद्द करण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यात गेल्या महिन्यात निर्बंध लागू झाल्यानंतर चित्रपटगृह, नाट्यगृह ५० टक्के आसन क्षमतेसह सुरू होती. त्यानंतर नाट्यगृहांमध्ये कोरोना निर्बंध पाळून नाटक, एकांकिका महोत्सव पार पडले. आता पुन्हा चित्रपटगृह, नाट्यगृह बंद झाल्यामुळे महाकवी कालिदास कलामंदिरात महिनाभरातील तीन नाटकं, नाट्यरसिक महोत्सवातील तीन एकांकिका रद्द करण्याची वेळ संयोजकांवर आली आहे. मेमध्ये अशीच परिस्थिती राहिल्यास मेमधील प्रयोगही रद्द करावे लागतील, अशी भीती संयोजकांना आहे. 

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप

चित्रपटांना पुन्हा ओटीटीचा (OTT) आधार

दरम्यान, चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण सुरू राहणार असले, तरी चित्रपट प्रदर्शनासाठी चित्रपटगृह बंद करण्यात आल्यामुळे निर्मात्यांना पुन्हा ओटीटीचा आधार घ्यावा लागणार असल्याचे दिसते. कोरोनानंतर नाटकांना सुरवात झाल्यानंतर नाटकांच्या प्रयोगासाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता. पुढील महिनाभरात सहा नाटकांचे प्रयोग, एक एकांकिका महोत्सव महाकवी कालिदास कलामंदिरात होणार होता. मात्र, राज्य सरकारने कडक निर्बंधांची अंमलबजावणी केल्यामुळे हे सर्व प्रयोग रद्द करावे लागणार आहेत, अशी माहिती आनंद जाधव, जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली.  

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार