नाट्य कलाकारावर गोळीबार प्रकरण उलगडले; तपासात धक्कादायक माहिती उघड

नाशिक : वाडीवऱ्हे शिवारात दुचाकीस्वार व्यक्तींनी गोळीबार करीत नाट्य कलाकारावर प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ग्रामीण पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मात्र, तपासानंतर आता या प्रकरणात वेगळेच सत्य समोर आले आहे. 

शहरातील कॉलेज रोड परिसरातील स्वप्नील दंडगव्हाळ या नाट्यकलावंतांच्या कारवर दुचाकीस्वार व्यक्तींनी गोळीबार करीत प्राणघातक हल्ला केल्याचे स्वप्नीलने पोलिसांना कळवले. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी तपासास सुरवात केली. मात्र, घटनाक्रमानुसार व परिस्थितीनुसार विसंगती आढळून आल्या.

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

नेमके काय घडले?

पोलिसांनी स्वप्नीलकडेच चौकशीस सुरवात केली. त्यात स्वप्नीलने खरा घटनाक्रम सांगत गोळीबाराच्या नाटकावर पडदा टाकला. कर्जबाजारी झाल्याने कर्ज दिलेले लोक स्वप्नीलकडे पैशांसाठी तगादा लावत होते. सततच्या तगाद्यातून सुटका करून घेण्यासाठी स्वप्नीलने स्वत:कडील बेकायदेशीर पिस्तूलमधून वाहनावर गोळीबार करीत स्वत:वर प्राणघातक हल्ला झाल्याचा बनाव केल्याचे उघडकीस आले. तसेच, या गुन्ह्यात त्यास साथ देणाऱ्या केशव संजय पोतदार (२५, रा. इंदिरानगर), रौनक दीपक हिंगणे (३१, रा. गुरुद्वारा रोड), आसिफ आमिन कादरी (३५, रा. मोठा राजवाडा) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील केशव, रौनक यांना गोळीबार झालेल्या ठिकाणाजवळ बोलावून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल दिले. तर केशव याने हे पिस्तूल आसिफकडे लपवण्यासाठी दिले.

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा

जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्र कुटे, सहायक निरीक्षक समीर अहिरराव, अनिल वाघ, सहाय्यक उपनिरीक्षक नवनाथ गुरुळे, रवींद्र शिलावट, हवालदार बंडू ठाकरे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.