नातीला वाचण्यासाठी आजीची बिबट्याशी झुंज! आजीने प्रतिकार करताच ठोकली धूम 

काळुस्ते (जि.नाशिक) : बिबट्याने मानसांवर हल्ला केल्याचे प्रकार नेहमी घडतात अशाच एका घटनेत बिबट्याला आजीच्या प्रतिकारापुढे हार मानून पळून जावे लागले. आजी-आजोबा नातवंडासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. मात्र नातीला वाचवण्यासाठी चक्क बिबट्याशी दोन हात केल्याची घटनेमुळे आश्चर्य  व्यक्त होत आहे. 

नेमके काय घडले?

इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव देवाचीवाडी शिवारात मंगळवारी (ता. २) सायंकाळी साडेसातच्या सुमारास खेडभैरव येथील देवाचीवाडी शिवारातील पुंडलिक डगळे यांची सहा वर्षाची मुलगी किरण ही नेहमीप्रमाणे मंदिर परिसरातील दुकानातून पायवाटेने घरी जात होती. बरोबर तिची आजी व बहीण होती. त्याच दरम्यान जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून किरणवर हल्ला चढविला.

बालिकेवर प्राथमिक उपचार सुरू

प्रारंभी तिची आजी घाबरली. तिने जोराचा आरडाओरड केली. मात्र तिने धाडस करून आजीने बिबट्याचा जोरदार प्रतिकार केला व बिबट्याच्या तावडीतून नातीला सोडविले. दरम्यान, जखमी झालेल्या बालिकेवर प्राथमिक उपचार सुरू आहेत. ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी तत्काळ वन विभागास माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.  बुधवारी (ता. ३) वन विभाग अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते. तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वनपाल ढोन्नर, रेश्मा पाठक, पाडवी, सय्यद, मुनिफ शेख आदींनी परिसरात गस्त घालून बिबट्याचा मागोवा घेतला. बिबट्यास जेरबंद करण्यासाठी आज घटनास्थळी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. दरम्यान, वन विभागाचे फिरते पथकप्रमुख पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी येऊन बिबट्यास जेरबंद करण्यासाठी सूचना दिल्या.