नाफेडच्या कांदा खरेदीची हवा ; खोदा पहाड, निकला चुहाँ

नाफेड कांदा खरेदी,www.pudhari.news

लासलगाव : राकेश बोरा

कांद्याचे घसरलेले दर पाहता केंद्र सरकारने नाफेडमार्फत तातडीने लाल कांदा खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. खरेदीचा प्रक्रिया सुरूदेखील करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, आशिया खंडात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीत मात्र अद्याप कांदा खरेदी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कांदा खरेदीची फक्त घोषणाच झाल्याचे दिसत आहे.

नाफेड सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील काही बाजार समितींतून ९०० टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. मुळात एका दिवसात नाशिक जिल्ह्यात दीड लाख क्विंटल कांदा विक्री होतो. त्यात नाफेडने दोन दिवसांत ९ हजार क्विंटलची कांदा खरेदी केली. त्यामुळे या खरेदीने कांदादरात काही वाढ होईल, याची शक्यता कमी आहे.

वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता शेतकऱ्यांची नाराजी परवडणारी नसल्याने सरकारने लाल कांद्याची नाफेडमार्फत खरेदी सुरू केल्याचे सुतोवाच केले. मात्र, गेल्या दोन दिवसांत अवघी नऊशे टन खरेदी झाली आहे. हा सर्व कांदा कोणत्याही बाजार समितीतून थेट खरेदी होणार नाही. फक्त फार्मर प्रोड्युसर कंपन्यांमार्फतच कांदा खरेदी होईल. त्यातही कांद्याची प्रतवारी करून द्यावी लागणार आहे. त्यामुळे उरलेला कांदा शेतकऱ्यांना कमी भावातच विकावा लागेल. परिणामी, शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नसल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रात यंदा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. शेतकऱ्यांची हीच व्यथा लक्षात घेऊन नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, यांची घोषणा म्हणजे खोदा पहाड निकला चूहा असेच आहे.

दिलासा वगैरे काही नाही

मुळात नाफेडची कांदा खरेदी म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा वगैरे काही नाही. नाफेड उन्हाळ कांदा खरेदी करतो. आतापर्यंत नाफेडने लाल कांद्याची एकदाही खरेदी केली नाही. नाफेड देशभरातून जेवढा कांदा खरेदी करतो तो फक्त संपूर्ण देशाची तीन ते चार दिवसांची गरज भागवतो. त्यामुळे फक्त बाजारभाव स्थिर करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. याचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती फायदा झाला, हा संशोधनाचा विषय आहे.

हेही वाचा : 

The post नाफेडच्या कांदा खरेदीची हवा ; खोदा पहाड, निकला चुहाँ appeared first on पुढारी.