मुंबई, पुढारी वृत्तसेवा : भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी २ लाख मेट्रीक टन कांद्याची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्धारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड) करण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी गोयल यांना दिले.
पत्रात मुख्यमंत्री शिंदे यांनी मह्टले आहे की, कांदा हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असून देशातील एकूण उत्पादनाच्या ३५ ते ४० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. चांगल्या पावसामुळे कांद्याचे उत्पादन २०२१-२२ मध्ये १३६.७० लाख मे.ट. झाले आहे. गतवर्षीपेक्षा २० लाख मे.टनाने उत्पादन जास्त झाले. पण बाजारपेठेतील किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्याने कांदा उत्पादकांमध्ये निराशा आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले. श्रीलंकेकडून मोठ्या प्रमाणावर कांदा आयात केला जातो. पण तेथील आर्थिक संकटामुळे या आयातीमध्ये देखील अडचणी आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सततच्या बदलत्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना निर्यातीतून उत्तम किंमत मिळणे शक्य होत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.
नाफेडकडून कांदा खरेदी २ लाख मे.टनाने वाढवावी
केंद्र सरकारने देखील निर्यात उत्पादनावरील शुल्क आणि करमाफीच्या योजनेत (Remission of Duties and Taxes on Export Products- RoDTEP) २ टक्के ऐवजी १० टक्क्यांपर्यंत लाभ वाढवून द्यावा, अशी राज्य सरकारची विनंती नाकारली आहे. आपल्या मंत्रालयाने या योजनेत १० टक्क्यांपर्यंत लाभ दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. सध्या नाफेडकडून कांदा खरेदी सुरु आहे. ती आणखी २ लाख मे.टनाने वाढवावी, अशी देखील विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नाफेडने २.३८ लाख मे.टन कांदा खरेदी यावर्षी एप्रिल ते जून मध्ये केली आहे. आणखी २ लाख मे.टन खरेदी केल्यास कांदा उत्पादकांना किंमतीच्या बाबतीत दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
- #RSS_मुख्यालय_घेराव हा ट्विटरवर सुरू असलेला ट्रेंड नेमका आहे तरी काय?
- नाशिक : रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसूती, अर्भक दगावले
- SBIचे व्याजदर आजपासून वाढले; गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे हप्ता वाढणार
The post नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करावा : मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय मंत्री गोयल यांना पत्र appeared first on पुढारी.