
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कांद्याचे घसरलेले दर पाहता केंद्र सरकारने नाफेडमार्फत तातडीने लाल कांदा खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. खरेदीचा प्रक्रिया सुरूदेखील करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गाेयल यांनी दिल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे खा. पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रात यंदा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. शेतकऱ्यांची हीच व्यथा लक्षात घेत डाॅ. पवार यांनी ना. गोयल यांची भेट घेत तातडीने योग्य त्या दरात नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीची मागणी केली. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पवार यांनी निवेदन दिले होते.
शेतकऱ्यांकडून निर्णयाचे स्वागत
केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, ग्राहक व्यवहार विभाग, ग्राहक व्यवहार यांच्या निर्देशानुसार कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत लाल कांद्याची खरेदी सुरू करण्यात आली आहे. नाफेडला खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार नाफेडने खरेदी सुरू केल्याचे ना. गोयल यांच्याकडून सांगण्यात आल्याची माहिती डाॅ. पवार यांनी दिली. कांदा खरेदीला परवानगी मिळाल्याने या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. कांदा खरेदीचा निर्णय तत्काळ घेतल्याबद्दल ना. गोयल, ना. फडणवीस, आ. बावनकुळे यांचे डाॅ. पवार यांनी आभार मानले आहेत.
हेही वाचा :
- येरवडा परिसरात वाहतुकीत बदल
- पुलवामा जिल्ह्यात चकमकीत दहशतवादी ठार
- पारगाव : मीना शाखा कालव्याला आवर्तन सुटले
The post नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीस मंजुरी appeared first on पुढारी.