Site icon

नाफेड मार्फत 950 मेट्रिक टन लाल कांदा खरेदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या आठ दिवसांपासून कांदा खरेदी नाफेडमार्फत व्हावी, यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार प्रयत्नशील होत्या. त्यांच्या आदेशानुसार, नाफेडमार्फत कांदा खरेदीला सुरवात झाली असुन दोन दिवसांत ९५० मेट्रिक टन लाल कांदा खरेदी केला असल्याची माहीती नाफेडचे व्यवस्थापक सुशिलकुमार यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यासह राज्यात कांदा प्रश्न ओढवला असतांना व लाल कांद्याला कमी भाव मिळत असल्याने ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करत होते. यावेळी काही विरोधी गटाकडून कांद्याबाबत उलटसुलट अफवा देखील पसरविण्यास आल्या होत्या, परंतु लाल कांदा खरेदी करण्यासाठी डॉ. पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनाच साकडे घातले आहे. याची तत्काळ दखल घेत लाल कांद्याची खरेदी नाफेडमार्फत सुरु करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ पवार यांनी सांगितले. नाशिक जिल्हात यंदा ५१ हजार हेक्टरवर कांदा पिकाची लागवड करण्यात आली होती. त्यातुन कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, सरासरी २५ टन याप्रमाणे जवळपास १२ लाख ७५ हजार मेट्रीक टन कांदा उत्पादन झाले आहे.

दरम्यान, लाल कांदा हा ढगाळ वातावरणामुळे व त्यात पाण्याचा अंश जास्त प्रमाणात असल्याने जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे या कांद्याची खरेदी बफर स्टॉकसाठी करण्यात येत नाही, असे असतांना देखील केवळ शेतकरी संकटात सापडला असल्याचे ओळखुन डॉ. पवार यांनी केंद्राला नाफेडमार्फत कांदा खरेदी करायला आग्रह धरला. आता नाफेडने कांदा खरेदी सुरु केल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.

नाफेड मार्फत कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांद्याची खरेदी सुरु झाल्याने कांद्याला योग्य तो हमीभाव मिळणार आहे. शेतक-यांनी कांदा नाफेडच्या अधिकृत केंद्रावर लिलाव करावा, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे.

सद्यस्थितीत जिह्यातील ८ केंद्रावर कांदा खरेदी सुरु करण्यात आली आहे. आणखी १० केंद्रावर म्हणजेच १८ केंद्रावर कांदा खरेदी करण्यात यावी, असे आदेश डॉ. पवार यांनी नाफेड व्यवस्थापनाला दिले आहेत. महाराष्ट्र राज्यासह शेजारील गुजरात मध्य प्रदेश व पंश्चिम बंगाल या राज्यात देखील कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न आले आहे. महाराष्ट्रातील कांद्याला बाहेरील राज्यात मागणी नसल्याने कांद्यांचे दर कोसळले आहेत. तसेच कांदा निर्यात सुरु असुन बाहेरील देशांची आर्थिक परिस्थिती नसल्याने कांद्याची मागणी कमी प्रमाणात होत आहे. लाल कांदा खरेदीच्या या निर्णायमुळे शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा : 

The post नाफेड मार्फत 950 मेट्रिक टन लाल कांदा खरेदी appeared first on पुढारी.

Exit mobile version