नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अर्ज माघारीनंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, तडजोडीच्या रणनितीवरून नामको बँक (NAMCO Bank Election) निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. प्रगती आणि सहकार या दोन्ही प्रतिस्पर्धी पॅनलनी आपल्या उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने, कोणास संधी अन् कोणाची गच्छंती यावरून चर्चा रंगत आहे. काहींकडून तर तडजोडीची रणनिती आखून दबावतंत्राची चाल खेळली जात असल्याने, हालचालींना वेग आला आहे.
दि नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह अर्थात नामको बँकेच्या संचालकपदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघारीचा शेवटचा दिवस जस जसा जवळ येऊ लागला आहे, तसतसा घडामोडींना वेग येत आहे. विशेषत: सत्ताधारी प्रगती पॅनलमध्ये बऱ्याच हालचाली घडत असून, उमेदवारीसाठी इच्छुकांकडून दबावतंत्राची चाल खेळली जात आहे. दुसरीकडे नेतेमंडळींकडून विरोधी सहकार पॅनलमधील काही बड्या नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्यांच्याकडून होत असलेली अवास्तव मागणी दबाव निर्माण करणारी ठरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहकार पॅनलच्या एका प्रमुख नेत्याला प्रगती पॅनलच्या नेत्यांनी गळाला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल पाच जागांची मागणी केल्याने, प्रगती पॅनलचे नेते बॅकफुटवर आल्याचे समजत आहे. अगोदरच पॅनलमधील पाच ते सहा विद्यमान संचालकांना डच्चू दावा लागणार असल्याने, विरोधी गटाला पाच जागा सोडणे परवडणारे नसल्याने ही ऑफर प्रगतीच्या नेत्यांनी धुडकावून लावल्याची माहिती समोर येत आहे. (NAMCO Bank Election)
दरम्यान, शुक्रवारी (दि.८) माघारीच्या तिसऱ्या दिवशी १४ जणांनी माघार घेतली असून, माघारीचा आकडा २५ वर पोहचला आहे. आजच्या माघारीनंतर आता निवडणूक रिंगणात २१ जागांसाठी १४७ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. सत्ताधारी पॅनलच्या नेत्यांकडून अर्ज माघारीसाठी शिष्टाई सुरु आहे. दरम्यान, अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी ११ तर तिसऱ्या दिवशी १४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. अर्ज माघारीची मुदत १२ डिसेंबरपर्यंत आहे.
यांनी घेतली माघार
शुक्रवारी माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये भाजप नेते तथा सत्ताधारी पॅनलचे नेते विजय साने यांचे पूत्र अजिंक्य साने यांच्यासह भगवान सानप, हर्षद दाढीवाल, सचिन गीते, मयूर गीते, सचिन कोठावदे, नितीन पवार, ललित नहार, शंकर वाघ,संजय सानप, विजय सदाफळ, प्रशांत सोनजे, पद्मा बुब, श्यामलाल मोहेकर यांचा समावेश आहे.
भवर यांच्याकडून याचिका दाखल
संदीप भवर यांनी संचालक मंडळाविरोधात घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळल्यानंतर भवर यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. याचिकेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निकालावर आक्षेप घेत आरबीआयकडून अधिक माहिती जाणून घेत संचालक मंडळाचे उमेदवारी अर्ज अपात्र करण्याचा उल्लेख आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि.११) याचिकेवर सुनावणी असून या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा :
- Pune News : झोपडपट्टी पुनर्वसनाच्याही आता होणार टोलेजंग इमारती
- Delhi : लॉरेन्स बिश्नोई टोळीचे २ शूटर्स पोलिसांच्या ताब्यात
- अनोखी, पण आरोग्यदायी लाल केळी
The post नामको बँक निवडणूक : तडजोडीच्या रणनितीतून दबावतंत्राची चाल appeared first on पुढारी.