नामपूरमधील तीन मंगलकार्यालये सील! अगोदरच लग्न ठरलेल्यांची आता अडचण

नामपूर (जि.नाशिक) : आगामी काळात ज्यांची लग्न या कार्यालयात करायचं ठरलं आहे, अशा वधूपित्यांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. विवाहसोहळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत आहे, असे निदर्शनास आले आहे.

शहरातील तीन मंगलकार्यालये सील

गेल्या काही दिवसांपासून नामपूर शहरात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे शहरातील तीन मंगलकार्यालये पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाकडून कडून सील करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. 

वधूपित्यांसाठी अडचणी निर्माण

ग्रामपंचायत प्रशासनानकडून वारंवार सूचना देऊनही मंगलकार्यालयातील गर्दी कमी होत नसल्याने प्रशासनाने ताहाराबाद रस्त्यालगतचे आर के लॉन्स, नळकस रस्त्यालगतचे शुभ मंगल लॉन्स, व मालेगाव रस्त्यालगतचे कृष्णाई लॉन्स या कार्यालयांवर कारवाई केली आहे. आगामी काळात ज्यांची लग्न या कार्यालयात करायचं ठरलं आहे, अशा वधूपित्यांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. नामपूर गावात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे, त्यामुळे प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

पोलीसांची कारवाई

जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी,  पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, सरपंच रेखा पवार, ग्रामविकास अधिकारी के. बी. इंगळे, पोलीस हवालदार जे.एल महाजन, पोलीस रविराज बच्छाव, बावरी, गुंजाळ, ग्रामपंचायत कर्मचारी विजय दाणी, आत्माराम पानपाटी यांनी ही कारवाई केली. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

 

विवाहसोहळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे आगामी काळात प्रमाणापेक्षा अधिक गर्दी असलेल्या ठिकाणी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नियमांची पायमल्ली होत असेल तर मंगल कार्यालयांना दंड करण्यात येईल. - रेखा पवार, सरपंच नामपूर