नामपूरला दहा दिवस कांदा मार्केट बंद! शेतमाल न आणण्याचे आवाहन 

नामपूर (जि.नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शुक्रवार (ता. २६)पासून ४ एप्रिलपर्यंत कांदा व भुसार माल खरेदी मार्केट बंद राहणार आहे. डाळिंब लिलाव केंद्रदेखील ३१ मार्चपर्यंत बंद राहील. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, मार्चअखेरमुळे राष्ट्रीयीकृत बँकांचे बंद असणारे व्यवहार, मजूरटंचाई, आर्थिक टंचाई आदी कारणांमुळे शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी बंद काळात माल विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे. 

नामपूरला दहा दिवस कांदा मार्केट बंद
मोसम खोऱ्यात उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम जोमाने सुरू आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक होत आहे. गेल्या आठवड्यात मोसम खोऱ्यात अवकाळी पाऊस व प्रचंड गारपीट झाल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांदा साठविण्यास योग्य नसल्याने बाजार समिती सुरू झाल्यांनातर कांद्याची आवक होईल, असा अंदाज आहे. नामपूर परिसरासह मोसम खोऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी लिलावप्रसंगी आपल्या चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल बांधणे आवश्यक असल्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला. संपूर्ण शेतमालाचे पेमेंट रोख स्वरूपात अदा केले जात असल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीत विक्रीस आणावा. रोख स्वरूपात पेमेंट न मिळाल्यास तत्काळ बाजार समिती कार्यालयात ०२५५५-२३४३३६ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.