नामपूर येथे कोविड रुग्णालय; वाढीव बेड संख्येमुळे रुग्णांना दिलासा

नामपूर, (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यात वैद्यकीय सुविधांअभावी कोरोना बाधित रूग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याची तक्रार आमदार दिलीप बोरसे यांनी केल्यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी त्याची गंभीर दखल घेत तत्काळ नामपुर येथे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

रिकव्हरी रेट फक्त 2 ते 3 टक्केच!

बागलाण तालुक्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. पंधरा दिवसातच कोरोना बाधित रुग्ण संख्येचा आकडा पंधराशे पार झाला आहे . तर वीसहून अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोनाची वाढती रुग्ण संख्येच्या तुलनेत कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांची संख्या दोन ते तीन टक्केच असल्याने अपुर्‍या बेड संख्या आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे गरीब रुग्णांची उपचारा अभावी मोठ्याप्रमाणात हेळसांड होत होती काही रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने आपला जीव गमावण्याची वेळ आल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत नामपुर येथे कोविड रुग्णालय ,अजमिर सौंदाणे व तळवाडे भामेर आश्रम शाळेत कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्याची मागणी केली. याबाबत तत्काळ सुविधा न पुरविल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशाराला दिला होता.

तक्रारींनंतर प्रशासनाला आली जाग 

आमदार बोरसे यांनी केलेल्या तक्रारीमुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी गंभीर दखल घेत नामपुर ग्रामीण रुग्णालयात 30 बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आदेश दिले आहेत . या रुग्णालयात 30 बेडला ऑक्सिजनची सुविधा राहणार आहे . तसेच अजमिर सौंदाणे येथील शासकीय निवासी शाळेत दोनशे बेडचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यासोबतच तळवाडे भामेर येथील आश्रमशाळेत कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहे . वाढीव बेड संख्येमुळे रुग्णांची सोय होणार आहे .

नवीन कोविड केअरने नागरिकांना दिलासा 

मोसम व करंजाडी खोर्‍यातील बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी नामपुर कोविड रुग्णालय तसेच तळवाडे भामेर शासकीय आश्रमशाळेत सुरू करण्यात येणार्‍या कोविड केअर सेंटर हे मध्यवर्ती ठिकाण असणार आहे . याठिकाणी अडीचशे रुग्णाची सोय होणार आहे. सध्या डांगसौंदणे कोविड रुग्णालयात 30 ऑक्सिजन बेडची सुविधा आहे . तर सटाणा  शहरातील नामपुर रोड वरील शासकीय वसतिगृहात 200 बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत . तसेच अजमिर सौंदाणे येथील निवासी शाळेत दोनशे बेड उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने संगितले.