नाशकातील जुने पडके वाडे ठरताहेत समस्यांचे आगार;नागरिक झालेत हैराण

नाशिक : कधीकाळी शहराची शोभा असलेले जुने नाशिक भागातील वाडे सध्याच्या परिस्थितीत मोडकळीस आले आहेत. बहुतांश वाडे कोसळून त्यांचा मलबा तेथेच पडून आहे. कधीकाळी सर्वांचे आकर्षण ठरणारे वाडे अडचणीचे कारण ठरत आहेत. वाडेधारकांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने हेच वाडे समस्यांचे आगार ठरत आहे. 

स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात 

काही वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडी, गाजरगवत वाढले आहे. हे ठिकाण डासांसाठी पोषक ठरत असल्याने येथे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. तर वाड्यात पडलेल्या मलब्यातील माती वाऱ्याने उडत रस्त्याने जाणारे दुचाकीचालक आणि नागरिकांच्या डोळ्यांत जाऊन इजा करत आहे.

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

पडके वाडे झालेत नशाबाजांचे अड्डे 

विविध प्रकारचा नशा करणारे फिरस्ते तरुण, लहान मुले रात्रीच्या अंधारात याच ठिकाणी वास्तव्य करून नशा करणे अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य त्यांच्याकडून केले जाते. काही दिवसांपूर्वी तांबट लेन भागातील एका वाड्यास आग लागली होती. ती आग अशाच नशेबाजांकडून लावल्याचे बोलले जात होते.

महापालिका प्रशासनाने ठोस पावले उचलावी 

 बहुतांश वाडे मोडकळीस आले आहेत. त्यांचा बहुतांश भाग कोसळून उर्वरित भाग तसाच पडून आहे. भविष्यात अचानक तो भाग कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

केवळ सोपस्कार नको 

पावसाळा आला, की महापालिका विभागीय कार्यालयाकडून त्यांच्या भागातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या वाडेधारकांना नोटीस बजावली जाते. वाडे उतरवून घेण्याचे नोटिशीत सांगितले जाते, दर वर्षी असे प्रकार घडतात. त्यांचा हा प्रयत्न केवळ सोपस्कार असतो. त्यांच्याकडून कुठली कारवाई होत नाही. वाड्यांचा प्रश्‍न ‘जैसे थे’च राहतो. त्यातून विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत.