नाशकात गजरा विक्री करणारा निघाला हत्यारा, उस्मानाबादमधील फरार आरोपी गजाआड

नाशिक : उस्मानाबादमध्ये दरोडा टाकून हत्या करत नाशिकच्या रस्त्यांवर चक्क गजरा विक्री करणाऱ्या एका आरोपीच्या नाशिक पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नाशिकमध्ये सध्या हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय. नाशिकच्या गजबजलेल्या मुंबई नाका सर्कलवर गेल्या काही महिन्यांपासून वाहनचालकांना विनवणी करत गजरा विक्री करताना एक तरुण नजरेस पडायचा. मात्र हाच गजरा विक्रेता सध्या पोलीस कोठडीची हवा खातोय.

सुनील काळे असं या 27 वर्षीय आरोपीचं नाव असून तो मूळचा उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील तेर येथे राहणारा आहे. 5 जून 2021रोजी कळंबच्या मार्केट यार्ड मधील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडे वॉचमन म्हणून कार्यरत असणाऱ्या मच्छिन्द्र माने यांची हत्या करून सुनील फरार झाला होता. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच नाशिकमध्ये विविध ठिकाणी सिग्नल तसेच चौकांमध्ये गजरे विकणारे बरचशे स्त्री-पुरुष उस्मानाबादचे असून यात सुनीलचाही सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात होती.

उस्मानाबाद पोलीस नाशिकमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी नाशिक पोलिसांना आरोपीचे वर्णन दिले होते. त्यानूसार नाशिक पोलिसांच्या टीमला मुंबई नाका सर्कलवर सुनील दिसून आला. पोलीस आल्याचे समजताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. खूनाच्या गुन्ह्याची त्याने कबुली देताच त्याला उस्मानाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

खरंतर प्रत्येकच शहरात आपल्याला सिग्नलवर किंवा रस्त्यावर गजरेविक्रेते, भिक्षेकरी किंवा हातावर पोट भरणारे नागरिक नजरेस पडतात. त्यांची हलाखीची परिस्थिती बघता अनेकजण त्यांना अधिकचे पैसेही देऊ करतात. मात्र अशा अनोळखी लोकांवर कोणाची नजर असणार?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलंय. गुन्हा करण्यासाठी गुन्हेगार अनेक नवनवीन शक्कल लढवत असून नाशिकमधील या घटनेमुळे तर सर्वत्र खळबळ उडालीय. मच्छिन्द्र मानेंच्या खून प्रकरणी उस्मानाबाद पोलिसांचा तपास सध्या सुरु असून यात अजून काय काय समोर येतं हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.