
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील गंगापूर, दारणासह अन्य प्रमुख धरण समूहांमध्ये डिसेंबरच्या मध्यामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. पाण्याची ही उपलब्धता बघता, जिल्हावासीयांची जून-२०२३ पर्यंतची पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली आहे.
जिल्ह्यात चालू वर्षी सरासरीच्या दीडपट पाऊस झाला. बहुतांश तालुक्यांमध्ये ऑक्टोबर एन्डपर्यंत पावसाचा मुक्काम होता. त्याचा फायदा धरणांना झाला आहे. जिल्ह्यात प्रमुख धरणांत सध्याचा उपयुक्त साठा ६३,०९९ दलघफू असून, त्याचे प्रमाण ९६ टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीच्या तुलनेत २ टक्के अधिक साठा आहे, तर सहाही प्रमुख धरण समूहांमध्ये सरासरी ९० टक्के व त्याहून अधिक साठा आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरण समूह असलेल्या गंगापूरमधील चारही प्रकल्प मिळून ९,१४३ दलघफू पाणी असून, त्याची टक्केवारी ९० आहे. त्यामुळे नाशिककरांची पाण्याची समस्या दूर झाली आहे.
इगतपुरीतील दारणा समूहातील सहा प्रकल्प मिळून एकूण उपयुक्त साठा १८ हजार १ दलघफू म्हणजेच ९५ टक्के आहे. पालखेडच्या तीन प्रकल्पांत ८,०४६ दलघफू (९७ टक्के), तर ओझरखेड समूहातील तीनही धरणांत २,९९२ दलघफू म्हणजेच ९३ टक्के साठा आहे. गिरणा खोऱ्यातील चणकापूर समूहातील पाच प्रकल्प मिळून २२,९६१ दलघफू पाणी असून हा समूह काठोकाठ भरला आहे. तसेच पुनदचे दोन प्रकल्प मिळून ९९ टक्के म्हणजे १,६३१ दलघफू पाणी शिल्लक आहे. दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वीच पिण्याच्या पाण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्यानंतर गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत ना. भुसेंनी सिंचनाच्या आरक्षणावरही अंतिम मोहोर उमटविल्याने जिल्हावासीयांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
जिल्ह्यातील पाणीसाठा
धरण समूह साठा (दलघफू) टक्के
गंगापूर 9,143 90
दारणा 18,001 95
पालखेड 8,046 97
ओझरखेड 2,992 93
चणकापूर 22,961 100
पुनद 1,631 99
एकूण 63,099 96..
हेही वाचा :
- बेळगावात पोलिसांची दडपशाही : महामेळाव्याला परवानगी नाकारली, मंडपाचे साहित्य जप्त, म. ए. समितीच्या नेत्यांना अटक
- नागरिकशास्त्र जास्त गुणांचे असायला हवे; राष्ट्रीय नास्तिक परिषदेत विश्वंभर चौधरी यांचे प्रतिपादन
- कोल्हापूर : जिल्ह्यात 74 प्रजातींच्या 514 पक्ष्यांची नोंद; 12 प्रजातींचे स्थलांतरित पक्षी
The post नाशिककरांची पिण्यासह सिंचनाचीही चिंता मिटली, धरण समूहांमध्ये 'इतका' पाणीसाठा appeared first on पुढारी.