नाशिककरांची रंगपंचमी रंगली घरातच; शहरासह उपनगरांत कडेकोट बंदोबस्त

नाशिक : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर धास्तावलेल्या प्रशासनाने कडक भुमिका घेतल्याने नाशिककरांना यावर्षी रंगोत्सवाचा आनंद घरातच घ्यावा लागला. प्राचीन चारही रहाडी बंदच राहिल्या. एवढेच नव्हे तर पोलिसांनी पंचवटीसह शहरातील काही महत्वाचे चौक बॅरीकेटींगद्वारे बंदीस्त करत चोख बंदोबस्त ठेवला.

होळीनंतर पाचव्या दिवशी येणारी रंगपंचमी अन नाशिककरांची धूम हे गत अनेक वर्षांचे जणू समिकरणच. परंतु यंदा प्रथमच कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी होणा-या रंगोत्सवाला बंदी घातली, एवढेच नव्हे तर जुनी तांबट गल्ली, तिवंधा, गंगाघाट व शनिवचौक येथील प्राचीन रहाडींवर रंगणा-या रंगोत्सवालाही परवानगी न देता त्यापरिसरात संचारबंदी लागू केली. त्यामुळे रंगप्रेमींचा मोठा हिरमोड झाला. नाही म्हणायला शहरातील गल्लीबोळांसह विविध उपनगरांत बच्चेकंपनीने आपल्या सवंगड्यांसह रंगाचा आनंद लुटला. मात्र ज्येष्ठांना केवळ टिळा लावण्यावरच समाधान मानावे लागले.

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

शहरात सर्वत्र शुकशुकाट

शहराच्या मुख्य चौकांसह अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. एवढेच नव्हे अनेक मुख्य रस्ते बॅरीकेटींगद्वारे बंदीस्त करण्यात आले होते. त्यामुळे नाशिककरांनी घरात राहूनच रंगोत्सव साजरा करण्यास पसंती दिली. करोनाची तीळमात्रही भिती न वाटणा-या िमुरड्यांनी मात्र आपल्या सवंगड्यांवर पिचकारीद्वारे रंग उडवून आनंद घेतला. 

रहाडी, रंगीत कारंजे बंदच

पेशवेकालिन रहाडी अन नाशिक हे जणू समिकरणच. परंतु रहाडींवर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेत पोलिस आयुक्तांनी या रहाडी उघडण्यास परवानगी नाकारण्याबरोबरच परिसरात संचारबंदी घोषित केली. त्यामुळे यावर्षी ‘रहाडीतील धप्प्यां’ची अनेकांची इच्छा अपूर्णरच राहिली. एवढेच नव्हे तर रोकडोबा, शिवसेवा आदी सार्वजनिक मंडळांसह अनेकांचे रंगीत संगीत कारंजेही बंदच राहिले. याशिवाय पुढील वर्ीच्या महापालिका निवडणुका लक्षात घेऊन अनेक इच्छुकांनी आधीच केलेले आयोजनही गुंडाळून ठेवावे लागले.

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

पंचवटीत परिसरातही शांतता

पंचवटी ः परिसरातील अनेक मंडळांकडून रंगपंचमीचे आयोजन केले जाते. यावर्षी पोलिसांनी मालेगाव स्टॅन्ड, सरदार चौक, शनी चौक, गंगाघावरील देवी मंदिर आदी भागात बॅरीकेटींग करून रस्ते बंद केले होते. याशिवाय शनीचौकातील रहाडीजवळही पोलिसांचा बंदोबस्त होता. एरवी मोठी वर्दळ असलेल्या रामकुंड, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, जुना आडगाव नाका, भडक दरवाजा, बाजार समिती परिसर आदी भागात संचारबंदीमुळे शुकशुकाट होता. नाही म्हणायला थोड्या प्रमाणात वाहतूक सुरू होती.