नाशिककरांच्या आरोग्याशी खेळ? रिपोर्टसाठी कोरोना संशयित रुग्णांना करावी लागतेय सात दिवस प्रतिक्षा

नाशिक : कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने नाशिकमध्ये प्रशासनाकडून अंशतः लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. मात्र, दुसरीकडे कोरोना संशयित रुग्णांना तब्बल आठवडाभर रिपोर्टसाठी प्रतीक्षा करावी लागत असून त्यांच्या आरोग्याशी एकप्रकारे खेळ खेळला असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. त्यामुळे कुठेतरी शासकीय आरोग्य यंत्रणाच कमी पडत असल्याच बघायला मिळतंय.

जानेवारी महिन्यात ज्या नाशिकची कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असल्याचं चित्र बघायला मिळत होतं. त्याच नाशिकमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने प्रशासनाकडून अंशतः लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा ईशाराही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडून देण्यात आलाय. मात्र, एकीकडे ही परिस्थिती असतानाच दुसरीकडे शासकीय आरोग्य यंत्रणाच कमी पडत असल्याचं धक्कादायक वास्तव एबीपी माझाच्या पाहणीत समोर आलंय.

कोरोना संशयित रुग्णाना तब्बल आठवडाभर RTPCR टेस्टच्या रिपोर्टसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे आमचा अहवाल पॉझिटीव्ह असेल आणि उपचार सुरु होण्यास जर उशीर झाला तर प्रशासन याची जबाबदारी घेणार का? असा संतप्त सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जातोय. शासकीय रुग्णालयात स्वॅब दिला असता 2 दिवसात रिपोर्ट येईल असे सांगितले तर जाते. मात्र, 7 दिवस उलटूनही रिपोर्ट हाती येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या या सर्व कारभारामुळे अनेक संशयित रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय.

दरम्यान नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक बापूसाहेब नागरगोजे यांना याबाबत विचारणा केली असता कोरोना बाधितांच्या संख्येतील वाढीमुळे कोरोना लॅबवरीलही कामाचा व्याप वाढलाय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ही सर्व परिस्थिती उद्भवली आहे, नाशिकचे सँपल औरंगाबादला पाठवावे लागत असून लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा काढला जाईल, असं त्यांनी म्हंटलय.

एकट्या नाशिकमध्येच नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ही परिस्थिती आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचं दिसून येताच आरोग्य यंत्रणेकडून अद्याप पावेतो लॅबची संख्या का वाढवण्यात आलेली नाही? ज्या जिल्ह्यात रुग्ण वाढतायत त्या जिल्ह्यातील लॅबमधील किटची संख्या कमी का? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होतायत. हे सर्व प्रकरण बघता एकप्रकारे आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप संशयित रुग्णाकडून केला जात आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याबाबत तात्काळ काहीतरी उपाययोजना करणे आता गरजेचे आहे.