नाशिककरांना उन्हाचा तडाखा

नाशिक मध्ये उन्हाचा तडाखा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

फेब्रुवारीच्या अखेरीस नाशिक शहंराचा पारा ३५.४ अंशावर जाऊन पोहोचला आहे. पाऱ्यातील वाढीने प्रचंड उकाडा जाणवायला लागला आहे. हवामानातील उष्णतेमुळे नाशिककरांना घामाच्या धारा लागल्या आहेत. दुसरीकडे उन्हामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कोकण किनारपट्टी भागात निर्माण झालेल्या उष्णतेची लाटेचा परिणाम अवघ्या राज्यावर झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमानाच्या पाऱ्यात तीन ते चार अंशांची सरासरी वाढ झाली आहे. नाशिकही त्याला अपवाद ठरलेले नाही. आताच शहराचा पारा ३५ अंशांपलीकडे जाऊन पोहचला आहे. सकाळी साडेदहानंतर उन्हाच्या तीव्र झळा बसत असल्याने नाशिककरांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते ओस पडता आहेत. तर उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कपाटातून टोपी, महिलांनी स्कार्फ बाहेर काढले आहेत. काहींनी खरेदीसाठी दुकानांमध्ये धाव घेतली आहे. तसेच उन्हापासून जीवाची होणारी लाहीलाही कमी करण्यासाठी सर्वसामान्य शीतपेये आणि ज्यूस सेंटरकडे धाव घेता आहेत. काही मुलांनी दरवर्षीप्रमाणे गोदाघाटावर आंघोळीसाठी गर्दी केली आहे.

ग्रामीण भागालाही उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. पाऱ्यातील वाढीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, येत्या आठवडाभर नाशिकसह राज्यात उष्णतेची तीव्र लाट कायम राहिल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

The post नाशिककरांना उन्हाचा तडाखा appeared first on पुढारी.