नाशिककरांना कोरोना काळातील उकाड्याची धग असह्य! पारा चाळिशीच्या दिशेने

नाशिक : नाशिकमध्ये रविवारी (ता. २८) कमाल तापमान ३९.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेल्याने पारा चाळिशीच्या दिशेने निघाल्याचे दिसून आले. २४ तासांपूर्वी ३८.२, तर ४८ तासांपूर्वी ३६.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका वाढत असताना कोरोना विषाणू संसर्ग फैलाव वाढत असताना घरी बसणे पसंत केलेल्या नाशिककरांना उकाड्याची धग असह्य झाली आहे. 

नाशिकचा पारा निघाला ४० अंश सेल्सिअसकडे 

गेल्या आठवडाभरात नोंदवण्यात आलेले कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये असे : सोमवार (ता. २२) ३५.६, मंगळवार (ता. २३) ३४.५, बुधवार (ता. २४) ३५.७, गुरुवार (ता. २५) ३६.४, शुक्रवार (ता. २६) ३६.१, शनिवार (ता. २७) ३८.२. पारा वाढत चालल्याचे चित्र गेल्या आठवडाभरात पाहावयास मिळाले. रविवारी मात्र सकाळी नऊनंतर उन्हं तापायला लागले होते. कोरोना विषाणू संसर्ग फैलावाच्या अनुषंगाने आज बंद असला, तरीही कौटुंबिक कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना उन्हाच्या चटक्याने अस्वस्थ केले. त्याचवेळी दुसरीकडे बंदच्या पार्श्‍वभूमीवर घरी थांबलेल्यांना सकाळी दहापासून गारव्यासाठी पंखा आणि व्यवस्था असलेल्या वातानुकूलित यंत्रणेचा आधार घ्यावा लागला. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

कोरड्या हवामानाचा अंदाज 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजच्याप्रमाणे सोमवारी (ता. २९) कोकण-गोवा भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात या महिन्याच्या अखेरपर्यंत हवामान कोरडे राहण्याचा विभागाचा अंदाज आहे. मुळातच सांताक्रूझ, चंद्रपूर, जळगाव, मालेगावमधील पारा चाळिशी पार गेला आहे. याच दिशेने नाशिकची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे उन्हाळ्यात फ्रीजमधील, बर्फ टाकलेले पाणी पिण्याबरोबर शीतपेय पिणे टाळावे, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. त्याचप्रमाणे शिळे अन्न खाऊ नये, सध्याच्या कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात प्रतिकारशक्तीला ‘बूस्ट' मिळेल असे पदार्थ आहारात ठेवावेत, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न