नाशिककरांना दिलासा! लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णसंख्येत २० टक्क्यांनी घट

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल बरीच चर्चा सुरू असली, तरीही नाशिककरांच्यादृष्टीने एक चांगली माहिती पुढे आली आहे. ती म्हणजे, लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णसंख्येत २० टक्क्यांनी घट झाली आहे. पूर्वी कोरोनाची ‘पॉझिटिव्ह' चाचणी आलेल्यांपैकी पन्नास टक्के रुग्ण लक्षणे असलेले आणि पन्नास टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आढळले होते. आता मात्र हेच प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. 

विषाणूची क्षमता क्षीण झाल्याचा परिणाम 

लक्षणे नसलेल्या रुग्णसंख्येत घट होण्यामागील कारण काय? याची माहिती आरोग्य विभागातून घेण्यात आली. त्या वेळी सध्याच्या हवामानात शहर आणि जिल्ह्यातील रहिवाशांनी आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरवात केल्याने रोगप्रतिकारशक्तीत वाढ झाली आहे. त्याचवेळी विषाणूची क्षमता क्षीण झाली आहे. ही माहिती आरोग्य विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली. सद्यःस्थितीत दोन हजार ७०५ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यातील ८२२ रुग्णांमध्ये लक्षणे आढळलेली आहेत. त्याचवेळी एक हजार ८८३ रुग्णांमध्ये लक्षणे सौम्य आहेत अथवा नाहीत. लक्षणे नसलेल्या रुग्णसंख्येत घट झाल्याने सार्वजनिक आणि खासगी आरोग्य व्यवस्थेवरील ताण हलका होण्यास मदत झाली आहे. सौम्य अथवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणात होत नसल्यास विलगीकरणाच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. 

औरंगाबादला स्वॅबची तपासणी 

शहर आणि जिल्ह्यातील चाचणी झालेल्यांपैकी एक हजार ६४५ स्वॅबचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे. त्यामध्ये नाशिक शहरातील एक हजार १५४, जिल्ह्यातील ४१२ आणि मालेगावमधील ७९ स्वॅबचा समावेश आहे. स्वॅब तपासणीसाठी औरंगाबादमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. प्रलंबित चाचण्यांच्या अनुषंगाने या महिनाअखेर दिवसाला ३०० ते ४०० रुग्ण येण्याची शक्यता यापूर्वी आरोग्य विभागाने वर्तवली होती. त्याचा प्रत्यय सद्यःस्थितीत येत आहे. पुढील महिन्यापासून रुग्णसंख्येचा आलेख घसरणीला लागण्याची एकीकडे शक्यता वर्तवण्यात येत असताना किमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली जाणाऱ्या भागात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाला वाटत आहे. 

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

ऑक्सिजनची गरज ४० टक्केच! 

कोरोनाची लागण झालेल्या आणि लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी ७० ते ७५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासायची. पण आता हेच प्रमाण ३० टक्क्यांनी घटले आहे. लक्षणे असलेल्या सध्याच्या ८२२ रुग्णांपैकी ४२४ रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने रुग्णांवर लक्ष केंद्रित केले आहे. कोमऑर्बिड रुग्णांशी भ्रमणदूरध्वनीवरून संपर्क ठेवण्यात येत आहे.  

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली