नाशिककरांनी घेतला मसालेदार दुधाचा आस्वाद

नाशिक, दुधाचा आस्वाद www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शीतल चंद्राचा मंद प्रकाश.. सोबतीला मंजूळ संगीत आणि आप्तस्वकीयांसमवेत गप्पांचा रंगलेला फड… अशा उत्साहपूर्ण वातावरणात नाशिककरांनी कोजागरी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला. यावेळी घट्ट आटवलेल्ल्या गोड दुधाचा आस्वाद घेत एकमेकांसाठी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तत्पूर्वी नाशिकची ग्रामदैवत श्री कालिका देवीसह शहरातील अन्य देवी मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली.

नवरात्रोत्सव धूमधडाक्यात साजरा केल्यानंतर रविवारी (दि.9) कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कोजागरी आणि रविवार सुट्टीचा मुहूर्त जुळून आल्याने पंचवटीमधील सांडव्यावरील देवी, जुन्या नाशिकमधील आद्य ग्रामदेवता भद्रकाली मातेसह घनकर गल्लीतील तुळजाभवानी, नाशिकरोडची दुर्गा माता, भगूरची रेणुकामाता तसेच शहरातील अन्य देवीच्या मंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

नाशिककरांनी सायंकाळनंतर चंद्राच्या साक्षीने इमारतींच्या टेरेसवर तसेच परिसरात आप्तस्वकीय आणि शेजारी कुटुंबासमवेत एकत्रित कोजागरीचा उत्सव साजरा केला. चंद्राला आटवलेल्या दुधाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यानिमित्ताने सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह बच्चेकंपनींसाठी विविध स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या. या कार्यक्रमानंतर नागरिकांनी एकत्रितरीत्या दुधाचा आस्वाद घेत कोजागरीचा उत्सव गोड केला.

शुभेच्छांचा वर्षाव : कोजागरीनिमित्ताने नाशिककरांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. नेटिझन्स्च्या व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसवर शुभेच्छांचे मेसेज ठेवले. तसेच ‘मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोड स्वाद दुधाचा, विश्वास वाढू द्या नात्यांचा त्यात गोडवा असू द्या साखरेचा’ यासारखे विविध मेसेजेस व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक व अन्य सोशल मीडियातून पाठवित आप्तेष्ट व मित्रमंडळांना कोजागरीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

हेही वाचा :

The post नाशिककरांनी घेतला मसालेदार दुधाचा आस्वाद appeared first on पुढारी.