‘नाशिककरांनी नेहमीच प्रेम अन उत्साह दिला’ अभिनेते भरत जाधव यांचा मनमोकळा संवाद 

नाशिक : नाशिककरांनी माझ्यावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. तब्बल नऊ महिन्यांच्या खंडानंतरही ते आपणास पुन्हा अनुभवण्यास मिळत असल्याचे मत मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते भरत जाधव यांनी व्यक्त केले.

नाटकांना ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद..

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गत नऊ ते दहा महिन्यांपासून चित्रपट, नाटकांच्या प्रयोगांना राज्य शासनाची परवानगी नसल्याचे सिनेमा व व्यावसायिक नाटकांचे प्रयोग बंदच होते. त्यामुळे प्रेक्षकांना मोठी प्रतीक्षा करावी लागली. मात्र, आता शासनाने पन्नास टक्के उपस्थितीच्या अटींवर सिनेमा व नाटकांच्या प्रयोगांना परवानगी दिली आहे. पन्नास टक्के उपस्थितीमुळे नाटके यशस्वी होतील का?, यापरिस्थितीत नाट्यसंस्थांना प्रयोग करणे परवडेल का? असे प्रश्‍न उपस्थित होत होते. याला येत्या रविवारी कालिदास कलामंदिरात सादर होणाऱ्या दोन्ही नाटकांना ‘हाऊसफुल्ल’ करून नाशिककरांनी छेद दिला आहे. 

नाट्यप्रेमींना ‘सही रे सही’ ​मेजवानी

अनलॉकनंतर येत्या रविवारी (ता.१७) नाशिककरांना नाटकांची तिसरी घंटा ऐकण्याची संधी मिळणार आहे. शहराचे वैभव असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिरात रविवारी दुपारी प्रशांत दामले यांचे ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ तर सायंकाळी भरत जाधव यांचे ‘सही रे सही’ असे दोन प्रयोग होत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही प्रयोग प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाने ‘हाऊसफुल्ल’ झाले आहेत. अनलॉकनंतर प्रेक्षकांनी प्रथमच रांगा लावून तिकिटे खरेदी करत नाट्य कलावंतांचा उत्साह वाढविला आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

नाशिककरांनी दिले प्रेम 

नाशिककरांनी माझ्या ‘मोरूची मावशी’, ‘श्रीमंत दामोदर परांजपे’, ‘सही रे सही’ अशा सर्वच नाटकांना नेहमीच मनापासून दाद दिली आहे. मात्र रविवारच्या प्रयोगाबाबत मोठी उत्सुकता होती. परंतु काही तासांतच हा प्रयोग हाऊसफुल्ल झाल्याने, प्रेक्षकांना मनोरंजनाची किती गरज होती, हे लक्षात येत असल्याचे जाधव यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना सांगितले. तब्बल नऊ महिन्यांच्या खंडानंतरही प्रेक्षकांचा प्रतिसाद व प्रेम पाहून आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. रसिक प्रेक्षकांचा हा आशीर्वाद पुढील काळातही असाच राहावा, अशी अपेक्षा अभिनेते जाधव यांनी शेवटी व्यक्त केली. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा