नाशिककरांनो आरोग्य सांभाळा! किमान तापमानासह कमाल तापमानही वाढले 

पंचवटी (नाशिक) : सध्या सकाळ व सायंकाळच्या सुमारास कडाक्याची थंडी, तर दुपारी उन्हाचा कडाका असा वातावरणातील विरोधाभास नाशिककरांना अनुभवास येत आहे. काही दिवसांपासून नाशिकच्या किमान तापमानासह कमाल तापमानात वाढ होत आहे. वातावरणातील या बदलांमुळे ज्येष्ठांसह लहान मुलांमध्ये सर्दी, पडसे, खोकल्यासारखे आजार बळावण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. 

थंडी आणखी वाढणार..

गतवर्षी सप्टेंबरअखेर झालेल्या जोरदार पावसानंतर यंदा थंडीचा कडाका राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला होता. परंतु, नोव्हेंबर, डिसेंबरचा काही काळ वगळता यंदा खऱ्या अर्थाने थंडी जाणवलीच नाही. मात्र, काही दिवसांपासून जम्मू काश्मीरसह उत्तरेकडील काही राज्यांत झालेल्या बर्फवृष्टीनंतर तसेच जानेवारीच्या सुरवातीला अवकाळीने सकाळ व सायंकाळच्या सुमारास कडाक्याची थंडी, तर दुपारी उन्हाची तीव्रता अशा विचित्र हवामानाचा सामना नाशिककर करत आहेत. त्यातच उत्तरेकडील शीतलहरींचा वेग वाढल्याने शहरात पुढील काळातही थंडी टिकून राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वातावरणातील बदलांमुळे श्‍वसनाचे आजार बळावण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 
नोव्हेंबरच्या सुरवातीलाच पारा मोठ्या प्रमाणावर घसरला होता. त्यानंतर अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे अवकाळीचा फटकाही सहन करावा लागला. अवकाळीमुळे किमान तापमानासह कमाल तापमानातही मोठी वाढ झाली. त्यामुळे नाशिककरांना खऱ्या अर्थाने यंदा काही अपवाद वगळता कडाक्याची थंडी अनुभवण्यास मिळालीच नाही. मात्र, सध्या उत्तरेकडे आलेल्या हवेच्या थंड लहरींमुळे आगामी काळात थंडीतही वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

काळजी घेण्याचे आवाहन 

सध्या सकाळ- सायंकाळ कडाक्याची थंडी, तर दुपारी अकरानंतर कडक ऊन असे वातावरण पाहावयास मिळते. यामुळे ज्येष्ठांसह लहान मुलांच्या विविध आजारांत वाढ झाली असल्याने उबदार कपडे परिधान करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय अतिथंड किंवा शिळे अन्न न खाण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. शरीरात उष्णता निर्माण होईल, असा आहार घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. ज्येष्ठांनी कडाक्याच्या थंडीबरोबरच कडक उन्हापासून दूर राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

सध्याच्या वातावरणातील बदलत्या स्वरूपामुळे ज्येष्ठांसह चिमुरड्यांच्या वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांचे संतुलन करण्यासाठी सूर्यनमस्कार, प्राणायाम नियमित करावे. 
- डॉ. एकनाथ कुलकर्णी, आयुर्वेदतज्ज्ञ