नाशिककरांनो तयार व्हा! कोरोना लसीकरण लवकरच होणार सुरु; रोज साठ हजार नागरिकांना लस

नाशिक : सगळ्या जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जगभरातील सर्व लहान मोठी व्यक्ती कोरोनाची लस कधी मिळते याकडे लक्ष ठेवून आहे. मात्र  नाशिककरांना लवकरच लस उपलब्ध होणार आहे. शनिवारी (ता.१९) जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांना यासंदर्भातील नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले.

 लसीकरणासाठी साडे सहाशे बुथ

केंद्र सरकारच्‍या दिशानिर्देशांनुसार लसींचा साठा प्राप्त झाल्‍यानंतर जानेवारीच्‍या तिसऱ्या आठवड्यापासून नाशिक जिल्‍ह्‍यात लसीकरण मोहिम राबविण्याची तयारी प्रशासकीय यंत्रणेने केलेली आहे. निर्धारित बुथच्‍या माध्यमातून रोज साठ हजार नागरिकांना लसीकरण करण्याची क्षमता असेल, असे यावेळी स्‍पष्ट करण्यात आले. आढावा बैठकीनंतर पालकमंत्री भुजबळ म्‍हणाले, की लसीकरणासंदर्भात प्रशासनाला जागृक राहाण्याच्‍या सूचना दिलेल्‍या आहेत. लशींचा साठा प्राप्त होताच लसीकरण मोहिम राबविली जाईल. जिल्‍ह्‍यात लसीकरणासाठी साडे सहाशे बुथ निर्माण केले जाणार आहेत. प्रत्‍येक बुथवर पाच अधिकारी-कर्मचार्यांची नियुक्‍ती केली जाईल. तसेच लसीकरणाच्‍या साठवणुकीसंदर्भातील कोडचेन यंत्रणादेखील निर्माण केली जाते आहे. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

लसीकरणाचा पर्याय असेल एच्‍छिक 

लसीकरणासाठी कुठल्‍याही नागरीकांना सक्‍ती केली जाणार नाही. परंतु कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरीकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन भुजबळ यांनी केले. त्‍यासाठी को-विन ॲपद्वारे नोंदणी प्रक्रिया राबवितांना दिल्‍या गेलेल्‍या सूचनांचे पालन करावे. बुथवर तीन खोल्‍या असणार आहेत. यापैकी प्रारंभी प्रतिक्षा कक्ष (वेटींग रूम), त्‍यापुढे लसीकरण कक्ष (व्‍हॅक्‍सीनेशन रूम) असेल. शारीरीक अंतर ठेवत व नागरीकांच्‍या कागदपत्रांची पडताळणी करून आत सोडले जाईल. तिसर्या टप्‍यात निरीक्षक कक्ष (ऑब्‍जरवेशन रूम) असेल. लसीकरणानंतर रूग्‍णास काही त्रास होतोय का, याचे निरीक्षण या ठिकाणी केले जाईल. काही गंभीर तक्रार जाणविल्‍यास आरोग्‍य सुविधा मिळण्यासंदर्भात उपाय उपलब्‍ध असतील. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

आढावा बैठकीस जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्‍त दीपक पांडे, पोलिस अधिक्षक सचिन पाटील, महापालिका आयुक्‍त कैलास जाधव, जिल्‍हा परीषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ.रत्‍ना रावखंडे, अतिरिक्‍त जिल्‍हा शल्यचिकित्‍सक डॉ.निखिल सैंदाने, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.कपिल आहेर, डॉ.बापूसाहेब नागरगोजे, डॉ.आवेश पलोड आदी उपस्‍थित होते.