Site icon

नाशिककरांनो, पाणी जपून वापरा!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हवामान तज्ज्ञांनी यंदाचे वर्ष ‘अल निनो’चे असू शकते, असा इशारा दिला आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात प्रमुख धरणांमध्ये आजमितीस 56 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, गेल्या वर्षी तो 60 टक्के होता. परिणामी धरणांतील उपयुक्त साठा व येणारा धोका वेळीच ओळखून नाशिककरांनी आतापासून पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणांमध्ये 37 हजार 65 दलघफू साठा उपलब्ध आहे. त्यातच चालू महिन्याच्या प्रारंभी झालेल्या अवकाळीने जिल्ह्यावरील टँकरचा फेरा लांबणीवर पडणार असल्याने जिल्हावासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, सध्या पाण्याची टंचाई जाणवत नसली, तरी यंदा राज्यावर ‘अल निनो’चे संकट घोंगावत आहे. परिणामी मान्सूनचे प्रमाण कमी होऊन भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. राज्य शासनानेही हा इशारा गांभीर्याने घेत आतापासूनच त्यादृष्टीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे नाशिककरांनाही पाण्याबाबत आतापासूनच काटकसर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील प्रमुख गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्पांमध्ये सध्या 65 टक्के साठा असून, तो 6 हजार 652 दलघफू इतका आहे. इगतपुरीतील दारणा समूहातील सहा प्रकल्प मिळून एकूण उपयुक्त साठा 12 हजार 999 दलघफू असून, त्याचे प्रमाण 69 टक्के आहे. याशिवाय पालखेड व ओझरखेड धरण समूहात अनुक्रमे 3,861 दलघफू (46 टक्के) तसेच 2,080 दलघफू (65 टक्के) पाणी उपलब्ध आहे. गिरणा खोर्‍यात चणकापूर समूहात 10,151 दलघफू (44 टक्के), तर पुनद समूहात 1,202 दलघफू (73 टक्के) साठा आहे.

प्रत्येक थेंबाचे नियोजन
दारणा धरणामधून सध्या सिंचन व पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. येत्या काळात ओझरखेडसह अन्य प्रकल्पांमधून आवर्तन सुटणार आहे. परिणामी धरणांमधील साठ्यात घट होणार आहे. ही बाब लक्षात घेत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करावे.

धरणसाठा (दलघफू) याप्रमाणे….
गंगापूर 3,805                             दारणा 5,184                               काश्यपी 1,678
आळंदी 451                               पालखेड 317                               करंजवण 2,865
वाघाड 679                                ओझरखेड 1,483                          पुणेगाव 365
तिसगाव 232                              भावली 973                                  मुकणे 5,144
वालदेवी 950                               कडवा 493                                 भोजापूर 120
चणकापूर 1,350                         हरणबारी 675                               केळझर 262
नागासाक्या 77                            गिरणा 7,787                                 पुनद 1,105
गौतमी-गोदावरी 718                   नांदूरमधमेश्वर 255.

हेही वाचा:

The post नाशिककरांनो, पाणी जपून वापरा! appeared first on पुढारी.

Exit mobile version