नाशिककरांनो सावधान! उघड्यावर कचरा टाकाल तर होणार कारवाई

जुने नाशिक : मोकळ्या मैदानावर मोठ्या लोकांनी टाकलेल्या कचऱ्यात सापडलेल्या बिलाच्या पावतीवरून कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन महापालिका कर्मचाऱ्यांकडून दंड आकारणी सुरू आहे. नाशिकला आरोग्य विभागाने चक्क पावत्या शोधून एकाकडून दहा हजारांचा दंड वसूल केला. कचरा टाकून पळणाऱ्यांना जरब बसणार आहे.

मोकळ्या जागेवर कचरा टाकल्याचे निदर्शनास

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहराच्या स्वच्छतेमध्ये बाधा आणणाऱ्यांवर सध्या महापालिका आरोग्य विभागाने कारवाईचा धडका लावला आहे. ‘स्वच्छ नाशिक- सुंदर नाशिक’ संकल्पना खऱ्या अर्थाने अस्तित्वात आणण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून विभागीय कार्यालयातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याचे पथक तयार केले आहे. त्यांच्या माध्यमातून स्वच्छता पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. शनिवारी (ता. २८) पूर्व विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट त्यांच्या पथकासह मुंबई-आग्रा मार्गावर गस्त करत अस्वच्छता पसरविणाऱ्याचा शोध घेत होते. येथील ऋणानुबंध मंगल कार्यालयाच्या शेजारील मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

बिलावरून व्यक्तीचा शोध

उघड्यावर टाकलेल्या कचऱ्याची पाहणी केली असता, त्यात रेमंड कुशनचे बिल आढळून आले. बिलावर असलेल्या पत्यावरून पथकाने त्यांच्याशी संपर्क केला. त्यांच्याकडून माहिती घेतली. कचरा त्यांनीच टाकल्याची माहिती समोर आली. पथकाने त्यांच्यावर कारवाई करत त्याना दहा हजारांचा दंड केला. शहराची स्वच्छता सांभाळत स्वच्छ भारत अभियानात शहराचे नाव स्वच्छ शहर म्हणून नावलौकिक व्हावे, यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांचे सहकार्य त्यासाठी महत्त्वाचे आहे.

यासंदर्भात शाळेतील विद्यार्थी, पालक, सामान्य नागरिक, व्यावसायिक यांच्यामध्ये अभियानास घेऊन जनजागृती करण्यात आली आहे. त्याना स्वच्छतेचे महत्त्व देखील पटवून सांगितले आहे. तरी देखील नागरिक यासर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत वेड्याचे सोंग घेत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाईची वेळ येत आहे. नागरिकांनी शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले.