नाशिककरांनो सावधान! कोरोना, इन्फल्युएंझाबाबत दक्षतेच्या सूचना

swine flue

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना आणि इन्फल्युएंझाचे रुग्ण आढळून येत असल्याने केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने आरोग्य विभागाला दक्ष राहण्याचे निर्देश देत नागरिकांनी काळजी घेण्याची सूचना केली आहे. सध्या नाशिकसह ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सिझनल इन्फल्युएंझाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिक मनपा आरोग्य वैद्यकीय विभागाकडून काळजी घेतली जात आहे.

सिझनल इन्फल्युएंझाचे प्रमाण जानेवारी ते मार्चमध्ये तसेच पावसाळा व त्यानंतर ऑगस्ट व ऑक्टोबरमध्ये वाढते. या आजाराच्या अनुषंगाने प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजनेसाठी शासनाने सूचना केल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात फ्लूसदृश रुग्णांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय यंत्रणेवर सोपविली आहे. सौम्य फ्लू रुग्णावर लक्षणानुसार उपचार तर निकट सहवासितांचा शोध व उपचार अशा दोन प्रकारांत सर्वेक्षण करण्यात येत आहे. इन्फल्युएंझा ए एच1 एन1 हा आजार पाच वर्षांखालील मुले, 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा हद्यरोग, मधुमेह स्थूलत्व तसेच फुप्फुस, यकृत, मूत्रपिंड यांचे आजार असणार्‍या व्यक्ती, चेतासंस्थेचे विकार असणार्‍या व्यक्ती, प्रतिकारशक्तीचा र्‍हास झालेली व्यक्ती व दीर्घकाळ स्टिरॉइड घेणार्‍या व्यक्ती अशा अतिजोखमीच्या व्यक्तींमध्ये हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो.

कोरोना किंवा इन्फल्युएंझा या आजाराचे लक्षण दिसल्यास दुखणे अंगावर न काढता तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घेतले पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरले पाहिजे. हात वारंवार स्वच्छ धुणे गरजेचे आहे. – डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा.

फ्लूसदृश आजाराची लक्षणे
फ्लूसदृश आजाराच्या रुग्णास ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला व नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी असे लक्षणे दिसून येतात. बालरुग्णात सौम्य ते मध्यम स्वरूपाचा ताप आढळतो. घसादुखी असणार्‍या बाळामध्ये तोंडातून अतिप्रमाणात लाळ गळताना आढळते. काही रुग्णांना जुलाब उलट्या होतात.

विलगीकरण कक्षाची स्थापना
प्रत्येक जिल्ह्यातील स्वाइन फ्लू उपचारासाठी निवडलेल्या रुग्णालयात विलगीकरण कक्षासाठी आवश्यक बाबी शासनाने स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार विलगीकरण कक्षात दोन खाटांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे. हवा खेळती असावी. रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर, पल्स ऑक्सीमीटर, सक्शन मशीन, इमर्जन्सी ट्रे, व्हेंटिलेटर्स ही यंत्रणा सज्ज असावी.

हेही वाचा:

The post नाशिककरांनो सावधान! कोरोना, इन्फल्युएंझाबाबत दक्षतेच्या सूचना appeared first on पुढारी.