Site icon

नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अलनिनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जलाशयांमध्ये उपलब्ध पाण्याचे ऑगस्ट एन्डपर्यंत नियोजन करण्यात आले असून, सध्या काळजी करण्यासारखी वेळ नाही. त्यामुळे जून-जुलैमध्ये आढावा घेत आवश्यकता वाटल्यास आठवड्यातून एकदिवस पाणीकपात लागू केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. त्यामुळे नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.८) जिल्ह्यातील संभाव्य टंचाई व त्यादृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबतचा आढावा घ‌ेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आषिमा मित्तल, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

अलनिनो वादळाच्या संकटामुळे मान्सून लांबण्याची व दोन पावसादरम्यान, मोठा खंड पडण्याची शक्यता हवामान क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्थांनी वर्तविली आहे. त्यामुळे अॉगस्टच्या अखेरपर्यंत पाण्याचे नियोजन केले आहे. तसेच तुर्तास कोठेही तीव्र टंचाईसारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. परिणामी पाणीकपातीचा निर्णय तातडीने घेणे आवश्यक नससल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.

अलनिनोमुळे उद‌्भवणाऱ्या संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेला ग्रामीण भागातील गावनिहाय आराखडा तयार करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. त्यामध्ये टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठ्यासाठीचे स्त्रोत निश्चित करावे. कोणत्या गावाला कोणत्या धरणातून पाणी पुरविता येईल, त्यासाठी टँकरचा मार्ग आदी विषयांवर सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला देण्यात आले. नादुरूस्त नळपाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती करून घेताना प्रगती पथावरील पाणी योजनांचे कामे तातडीने पूर्ण करावे. जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्या बाबत योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश भुसे यांनी सदर यंत्रणांना केले आहेत. नांदुरमध्यमेश्वर येथील पाणवेली काढण्यासाठी नाशिक मनपाची मदत घ्यावी, असेही जिल्हा परिषदेला सूचना केल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले. बैठकीला नाशिक व मालेगाव महापालिका, जिल्हा परिषद, जलसंपदासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उंटप्रकरणात कारवाई करावी

उंटांच्या तस्करीच्या चर्चांबाबत पोलीस विभागाशी चर्चा केली आहे. सदर उंट हे कोठून आणले, कोठे नेले जात आहेत, त्यांच्या चाऱा-पाण्याचा प्रश्न, राजस्थानात ते परत पाठवावे का? यासह उंट घेऊन येणाऱ्या व्यक्ती यांची सखोल माहिती पोलीस गोळा करत आहेत. या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश पोलीसांना दिल्याचे ना. दादा भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले appeared first on पुढारी.

Exit mobile version