नाशिककरांसाठी दिलासा! अ‍ॅक्टीव्ह रूग्णसंख्येत 2 दिवसांत 129 ने घट; 526 रूग्ण कोरोनामुक्‍त

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत आढळलेल्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्‍त झालेल्या रूग्णांची संख्या अधिक राहिल्याने अॅक्‍टीव्ह रूग्ण संख्येत घट झाली आहे. दोन दिवसांत 402 बाधित आढळले असून, 526 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पाच रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यातून ऍक्‍टीव्ह रूग्ण संख्येत 129 ने घट झाली असून सद्य स्थितीत जिल्ह्यात 2 हजार 515 बाधितांवर उपचार सुरू आहे.

दोन दिवसांत 526 रूग्णांनी कोरोनावर मात

जिल्ह्यात काल (ता.14) दिवसभरात 210 बाधित आढळून आले. यापैकी नाशिक शहरात 135, नाशिक ग्रामीणला 74 तर मालेगाव महापालिका हद्दीत एक बाधित आढळला आहे. तर रविवारी (ता.15) दिवसभरात 192 बाधित आढळून आहे. यापैकी नाशिक शहरातील 131, नाशिक ग्रामीणचे 57, मालेगावचे तीन तर जिल्हाबाह्य एक बाधित आढळून आला आहे. तर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत 526 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून, यापैकी नाशिक शहरातील 226, नाशिक ग्रामीणचे 294, मालेगावचे दोन तर जिल्हाबाहेरील चार रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या दोन दिवसांत जिल्ह्यात पाच रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी दिंडोरीरोडवरील 65 वर्षीय महिला तर सातपुरच्या जाधव संकुल परीसरातील 63 वर्षीय पुरूष अशा नाशिक शहरातील दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

आतापर्यंत जिल्ह्यात 97 हजार 038 बाधित

नाशिक ग्रामीण भागातील देवळ्यातील 71 वर्षीय पुरूष, इगतपुरी तालुक्‍यातील 72 वर्षीय महिला आणि येवला तालुक्‍यातील 65 वर्षीय पुरूष रूग्णाचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 97 हजार 038 बाधित आढळून आले आहेत. यापैकी 92 हजार 793 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून, 1 हजार 730 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात नाशिक महापालिका रूग्णालये व गृहविलगीकरणात 464, नाशिक ग्रामीण रूग्णालये व गृहविलगीकरणात 12, मालेगाव महापालिका हद्दीतील रूग्णालये व गृहविलगीकरणात दोन रूग्ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत 274 अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणचे 108, नाशिक शहरातील 144, मालेगावचे 22 रूग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात