नाशिककरांसाठी दिलासा! कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ९६ टक्क्यांवर

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून शहरात महापालिका व खासगी टेस्टींग लॅबच्या माध्यमातून दोन लाख ६४ हजार २८९ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात ६४ हजार ४८९ नागरिक कोरोना बाधित आढळले असून बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

सुरुवातीला एक लाख त्यानंतर २५ हजार रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट किट खरेदी

एप्रिल महिन्यात शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर टप्प्याटप्प्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत गेली. मे महिना अखेर परिस्थिती नियंत्रणात होती. परंतू जून महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढू लागला. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये तर कोरोनाने उच्च पातळी गाठली. हजारांच्या घरात रुग्णांची संख्या वाढल्याने भिती निर्माण झाली. महापालिकेने जुलै महिन्यात रॅपिड ॲण्टीजेन टेस्टची संख्या वाढविली त्यासाठी सुरुवातीला एक लाख त्यानंतर २५ हजार रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट किट खरेदी केल्या. रुग्णांच्या वाढत्या संख्येने बेडची संख्या देखील वाढविण्यात आली. व्हेंटीलेटर व ऑक्सिजन बेडची कमतरता शहरात भासू लागली.

सद्यस्थितीत शहरात ३८२ प्रतिबंधित क्षेत्रे

खासगी रुग्णालयांमध्ये ८० टक्के बेड आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना संसर्गाची भयावह स्थिती असताना मोठ्या प्रमाणात टेस्ट वाढविण्यात आल्या. त्यात शहरात आतापर्यंत दोन लाख ६४ हजार २८९ चाचण्या करण्यात आल्या. एक लाख ८६ हजार ७९९ टेस्ट निगेटिव्ह आढळल्या. तर ६४ हजार ४८९ पॉझिटिव्ह आढळले. ६२ हजार ३३ कोरोनाबाधितांवर उपचार करून सोडून देण्यात आले. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने कोरोना संसर्ग नियंत्रणाच्या बाबतीत परिस्थिती समाधानकारक असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना प्रतिबंधित क्षेत्रे घोषित केली जात होती. आतापर्यंत १५,४१५ प्रतिबंधित क्षेत्रे घोषित कररण्यात आली सद्यस्थितीत ३८२ प्रतिबंधित क्षेत्रे शहरात अस्तित्वात आहे.

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी