नाशिकचा कांदा खातोय ‘भाव’! पाकची निर्यात अंतिम टप्प्यात असताना गुणवत्तेचा प्रश्‍न 

नाशिक : गुजरातमधील दोन बाजारपेठांमधून दिवसाला पन्नास हजार पोत्यांमधून कांदा विक्रीसाठी येतो आहे. पण व्यापाऱ्यांच्या एकजुटीतून दिवसाला चाळीस हजार ते पन्नास हजार पोत्यांमधील कांद्याचा लिलाव होत आहे. त्याचा एक चांगला परिणाम नाशिकच्या शेतकऱ्यांना पाहायला मिळतो आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत जिल्ह्यातील बाजारपेठांमधून क्विंटलला ८०० ते ९०० रुपयांनी अधिकचा भाव कांद्याला मिळतोय. त्याचवेळी पाकिस्तानमधील कांद्याची निर्यात अंतिम टप्प्यात पोचली असताना कांद्याच्या गुणवत्तेचा प्रश्‍न निर्यातदारांना भेडसावू लागला आहे. 

नाशिकच्या कांद्याला ‘भाव’ खाण्यास गुजरातमधील खरेदी पद्धतीचा हातभार 
सिंगापूर, मलेशिया, श्रीलंकेच्या बाजारपेठेत तुर्कीस्तान, इजिप्तचा कांदा पोचण्यासाठी ३० ते ४० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे येत्या दोन आठवड्यांत पाकिस्तानचा कांदा मिळणे बंद होताच, आठ दिवसांनी मिळणाऱ्या भारतीय कांद्याला पसंती मिळण्याची आशा निर्यातदारांना वाटते आहे. सद्यःस्थितीत पाकिस्तानच्या कांद्याला टनाला ३५० डॉलर भाव मिळतो आहे. मात्र, देशांतर्गत कांद्याचे भाव वाढल्याने भारतीय कांद्याचा टनाचा भाव पाचशे डॉलरवरून ६५० डॉलरपर्यंत पोचला आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्यापैकी पाच ते सात टक्क्यांपर्यंत निर्यात होत असल्याचा निर्यातदारांचा अंदाज आहे. मुळातच, निर्यातदारांनी पाकिस्तानचा कांदा मार्चअखेरपर्यंत जागतिक बाजारपेठेत पोचेल, असा ठोकताळा बांधला होता. मात्र एक ते दीड महिना अगोदर कांद्याच्या गुणवत्तेमुळे पाकिस्तानच्या कांद्याला पसंती मिळणे बंद होण्याची शक्यता आता निर्यातदारांना वाटू लागली आहे. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

दक्षिणेसह देशांतर्गत कांदा होतोय रवाना 
मध्य प्रदेशातील कांदा स्थानिक ग्राहकांसाठी विकला जात आहे. गुजरातमध्ये आवक आणि भाव वाढत असताना गुजरातमधील कांदा पंजाब, दिल्ली, हरियाना, राजस्थानच्या ग्राहकांसाठी पाठवला जात आहे. त्यामुळे दक्षिणेसह देशांतर्गत बाजारपेठेत सद्यःस्थितीत नाशिकचा कांदा रवाना होत आहे. गुजरात, पश्‍चिम बंगाल आणि दक्षिणेतून नवीन कांद्याची आवक येत्या पंधरा दिवसांमध्ये वाढणार आहे. याचदरम्यान, महाराष्ट्रातील नवीन कांद्याची आवक वाढण्यास सुरवात होईल. तरीही सर्वसाधारपणे किलोला २० ते २५ रुपयांपर्यंत भाव कमी होण्यासाठी पुढील महिना उजाडण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच
 
नवीन कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 
बाजारपेठ मंगळवार (ता. २) २९ जानेवारी 
लासलगाव तीन हजार ५०० दोन हजार ७०० 
मुंगसे तीन हजार ५०० दोन हजार ७०० 
कळवण तीन हजार ५५० दोन हजार ७५० 
चांदवड तीन हजार २०० दोन हजार ५५० 
मनमाड तीन हजार ३०० दोन हजार ६०० 
देवळा तीन हजार ७०० दोन हजार ८०० 
पिंपळगाव तीन हजार ४५१ दोन हजार ५०१ 

गुजरातमधील दोन बाजारपेठांमधून आवक वाढली, तरीही आवक झालेला कांदा त्याचदिवशी विकला जात नाही. गुजरातमध्ये कांदा विक्रीच्या प्रतीक्षेत पडून राहतो. ही समस्या दूर करण्यासाठी गुजरातमध्ये आणखी दोन ते तीन बाजारपेठांचा विस्तार करावा आणि विक्री-वाहतूक व्यवस्थेची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. ही बाब निर्यातदारांच्या संघटनेतर्फे केंद्र सरकारपर्यंत पोचविण्यात आली आहे. -विकास सिंह, निर्यातदार