
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही हंगामापासून महाराष्ट्र संघाच्या गोलंदाजीचा कणा असलेला नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पुणे येथे रणजी ट्रॉफीच्या सामन्यात बळींचे शतक पूर्ण केले. महाराष्ट्रातर्फे खेळत असा पराक्रम करणारा सत्यजित हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. समरजित सिंग यास बाद करून हा टप्पा पूर्ण केला. २७ सामन्यांतील ४७ डावांत त्याने हे कामगिरी केली. एका सामन्यात ११, तर एक डावात ८ बळी ही सत्यजितची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. त्याने ४ वेळा डावात ५, तर ६ वेळा डावात ४ गडी टिपले आहेत.
राष्ट्रीय पातळीवरील अशा सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच गेल्या दोन हंगामांपासून आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत सत्यजितचा समावेश झाला होता. आयपीएल लिलावात २० लाख इतकी कमीत कमी बोली किंमत मिळणार्या खेळाडूंच्या आतापर्यंत प्रतिनिधित्व न केलेल्या गटात समाविष्ट होता. त्याबरोबरच आयपीएल-२०२२ च्या हंगामासाठी महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सतर्फे संघाच्या शिबिरासाठी निवड झाली होती. सत्यजितला चेन्नई सुपर किंग्सने गोलंदाजी विशेषज्ञ म्हणून संघाच्या शिबिरात खास निमंत्रित केले होते.
प्रतिस्पर्धी संघाचा कर्दनकाळ ठरणाऱ्या सत्यजितच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, नाशिक क्रिकेट वर्तुळात अतिशय उत्साहाचे आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजितचे कौतुक करत भविष्यातील चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा :
- Maharashtra Winter Session :सीमावादाचे नागपुरातील विधिमंडळात पडसाद; …तर ॲक्शनला रिॲक्शन होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- विकासाला मारक असलेल्यांना ईशान्य भारताने रेड कार्ड दाखविले : पंतप्रधान मोदी
- नाशिक : व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्था सभेत लेखापरीक्षण अहवालावरून गदारोळ
The post नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावचे बळींचे शतक appeared first on पुढारी.