नाशिकचे “गुगल’, ‘मॅक्स’ देशपातळीवर चमकले ; अंमली पदार्थ शोधून…

गुगल मॅक्स,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोपाळ येथे झालेल्या ६६ व्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात नाशिक शहर पोलिस दलातील गुगल व मॅक्स या श्वानांनी सर्वांचे लक्ष वेधले. गुगलने गुन्हे शोधात, तर मॅक्सने अंमली पदार्थ शोधून वाहवा मिळवली. राज्यातील पोलिस दलातील सुमारे ४५० हून अधिक श्वानांमधून या मेळाव्यासाठी नाशिक पोलिस दलातील गुगल व मॅक्सची निवड झाली होती.

पोलिस मेळाव्यात देशभरातील पोलिसांसह सर्व पॅरामिलिटरी फोर्स दलातील श्वानपथकांनी सहभाग नोंदवला होता. त्यात देशभरातील २०० हून अधिक श्वानांनी सहभागी होत प्रात्यक्षिके दाखवले. त्यात महाराष्ट्रातील सहा श्वानांची निवड झाली होती. तसेच पोलिस दलातील ३२ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला होता. डॉबरमॅन प्रजातीचे गुगल व जर्मन शेफर्ड प्रजातीचे मॅक्स श्वानाने आत्तापर्यंत शहरातील अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात मदत केली आहे. गुगल व मॅक्सने पोलिस दलातील इतर स्पर्धांमध्येही चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली आहे. पोलिस दलाच्या राष्ट्रीय स्पर्धेत गुगलने कांस्यपदक, पोलिस रेझिंग डे ला गुगलने सादर केलेला डेमो, राज्यस्तरीय पोलिस स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली आहे

गुगल व मॅक्स यांच्यासह त्यांचे हँडलर पोलिस हवालदार गणेश कोंडे, पोलिस नाईक अरुण चव्हाण व विलास पवार यांनी मेहनत घेतली. या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पथकाचे अभिनंदन केले.

हेही वाचा :

The post नाशिकचे "गुगल', 'मॅक्स' देशपातळीवर चमकले ; अंमली पदार्थ शोधून... appeared first on पुढारी.