नाशिकचे ठक्कर डोम कोविड सेंटर पुन्हा सुरू होणार! क्रेडाईचा हिरवा कंदील  

नाशिक : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधित होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी क्रेडाई नाशिक मेट्रोला केलेल्या विनंतीनुसार साडेतीनशे बेडचे कोविड सेंटर पुन्हा ठक्कर डोम येथे उभारले जाणार आहे. आयुक्तांच्या विनंतीला मान देऊन ‘क्रेडाई’ने कोविड सेंटर उभारणीचा निर्णय घेतला आहे. आठ ते दहा दिवसांत हे सेंटर उभारले जाईल. 

ठक्कर डोम कोविड सेंटर पुन्हा सुरू होणार 
गेल्या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने समाजकल्याण, मेरी येथे कोविड सेंटर उभारले होते. बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या ‘क्रेडाईने’देखील आपत्कालीन परिस्थितीत धावून जाण्याचा निर्णय घेताना कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने ठक्कर डोम येथे ३५५ खाटांचे कोविड सेंटर उभारले होते. त्यात ५० बेड ऑक्सिजनचे होते. ठक्कर डोम येथील कोविड सेंटरमध्ये तीन हजारांहून अधिक कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आले, तर हजारो रुग्णांना औषधे पुरविण्यात आली. रुग्णसंख्या घटल्यानंतर सेंटर बंद करण्यात आले होते. मात्र, फेब्रुवारीत कोरोनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागले.

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

वैद्यकीय सुविधा भक्कम

वैद्यकीय सुविधा भक्कम करण्याच्या दृष्टीने ठक्कर डोम येथील कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची विनंती आयुक्त जाधव यांनी ‘क्रेडाई’कडे केली होती. त्यानुसार परवानगी देण्यात आली असून, लवकरच ठक्कर डोम येथील सेंटर सुरू होणार आहे. ‘क्रेडाई’चे माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर, जितूभाई ठक्कर, सुनील कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली ‘क्रेडाई’चे अध्यक्ष रवी महाजन, उपाध्यक्ष कृणाल पाटील, सचिव गौरव ठक्कर, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड कोविड सेंटर उभारणीसाठी प्रयत्नशील आहेत. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता