नाशिकचे बिटको कोविड रुग्णालय फुल्ल! पर्यायी व्यवस्था शोधण्यास सुरवात 

नाशिक रोड : परिसरातही कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे नवीन बिटको रुग्णालयातील कोविड सेंटर भरले आहे. गेल्या महिन्यात हे कोविड सेंटर रिकामे होऊ लागले होते; परंतु आता रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाला पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. 
रविवारी (ता. २१) बिटको कोविड सेंटरमध्ये ४८० रुग्णांवर उपचार सुरू होते. या सेंटरची क्षमता ५०० कोविड रुग्णांची आहे. 

बिटको कोविड रुग्णालय फुल
नागरिकांच्या निष्काळजीपणा असाच कायम राहिला आणि त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही तर कोरोना संसर्ग वाढू शकतो, अशी माहिती सेंटरचे प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी दिली. बिटको कोविड सेंटरमध्ये नवीन लॅब नुकतीच सुरू होणार आहे. तसेच, ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये म्हणून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. शनिवारी महापालिका आयुक्त कैलास जाधव आणि पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी या रुग्णालयाला भेट देऊन सूचना केल्या होत्या. नंतर नाशिक रोडला दंडात्मक कारवाई केली होती. 

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

पर्यायी व्यवस्था शोधण्यास सुरवात 
बिटको कोविड रुग्णालय जवळजवळ भरत आल्यामुळे प्रशासनाने पर्यायी व्यवस्था शोधण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, डॉ. जितेंद्र धनेश्वर, उपअभियंता नीलेश साळी यांनी मुक्तिधाममधील गोवर्धन निवास, अयोध्या भवन व गोकुळ भवन या भक्त निवासाच्या तीन इमारतींची पाहणी केली. मुक्तिधामचे विश्वस्त नटवरलाल चौहान व जगदीश चौहान यांच्याशी चर्चा केली. भक्त निवासात कोविड रुग्णांसाठी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या.  

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ