नाशिकचे भाजप नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर? राजकीय वातावरणात चर्चा

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. फ्लॉवर शोच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्याला निमंत्रित न करता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन केल्याने चर्चेला निमित्त ठरले आहे. 

भाजप नगरसेवक शशिकांत जाधव राष्ट्रवादीच्या वाटेवर? 

जानेवारीत फ्लॉवर शोचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्‌घाटन पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते केले. त्या वेळी भाजपच्या एकाही वरिष्ठ नेत्याला त्यांनी निमंत्रित न केल्याने त्याचवेळी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. स्थायी समितीत त्यांना स्थान मिळाल्याने आता अधिक जोरात राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.  

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

नाराज जाधव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा

२००७ च्या महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माध्यमातून शशिकांत जाधव यांनी सत्तेच्या राजकारणात प्रवेश केला. मनसेकडून सलग दोन पंचवार्षिकमध्ये ते निवडून आले. २०१२ मध्ये महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर महापौरपदाची संधी हुकली. त्यानंतर त्यांना सभागृह नेतेपद देण्यात आले. परंतु काही कालावधीनंतर पद काढून घेण्यात आले. मनसेच्या सत्ता काळात दुसऱ्या टर्ममध्ये देखील महापौरपदाची संधी हुकली. स्थायी समितीवरही संधी न मिळाल्याने पक्षात अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाल्याने त्यांनी २०१७ पूर्वी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या जाधव हे भाजपचे नगरसेवक आहेत.

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा

भाजपच्या सत्ता काळातही त्यांना स्थायी समिती सदस्य वगळता मोठे पद मिळाले नाही. पंचवार्षिकमधील शेवटचे वर्ष असल्याने स्थायी समिती सभापतिपद मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु तेथेही संधी मिळाली नाही. त्यामुळे नाराज जाधव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.