नाशिकचे शेतकरी थेट मुंबईकरांच्या दारात; संकटामुळे दारोदार द्राक्ष विकण्याची वेळ

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : दराअभावी द्राक्ष उत्पादक कधी नव्हे, एवढ्या अभूतपूर्व संकटात सापडला आहे. १५ ते २० रुपये किलोने परप्रांतीय व्यापारी सौदे करू लागल्याने शेतकऱ्यांवर थेट दारोदार द्राक्ष विकण्याची वेळ आली आहे. नफा तर दूरच मुद्दल मिळावी, या उद्देशाने विज्ञान मंडळाच्या माध्यमातून आहेरगाव, खेरवाडी (ता. निफाड) येथील शेतकरी थेट मुंबई गाठत घरोघरी द्राक्षविक्री करीत आहेत.

द्राक्ष उत्पादकांवर दारोदारी द्राक्ष विकण्याची वेळ 

 तीन वर्षांपासून अस्मानी- सुलतानी संकटांनी शेतकरी अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. यंदा आशेचा किरण दिसत असताना, दराने मोठी निराशा केली. कोरोनाच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून द्राक्षांचे दर पाडले जात आहेत. लुटीमुळे नफा तर दूरच गुंतवणूक केलेली रक्कम हाती मिळावी, यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. द्राक्ष हंगाम सध्या वेगात सुरू आहे, पण दराअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. तरीही मिळेल त्या भावात शेतकरी सौदे करून बागा खाली करून घेत आहेत. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

शेतकरी मुंबईकरांच्या दारात... 
आतापर्यंत शेतकरी पिकवतो. घाऊक व्यापारी त्यांच्याकडून खरेदी केलेली द्राक्ष किरकोळ विक्रेत्यामार्फत ग्राहकापर्यंत पोचतात, असे चित्र होते. मात्र, यंदा हे चित्र काहीसे बदलले आहे. निफाड तालुक्यातील शेतकरी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या दारात द्राक्ष विक्री करताना दिसत आहेत. एकेकाळी द्राक्षबागायदार म्हणजे रूबाब व समाजात मान होता. मात्र, सलग संकटामुळे शेतकरी उत्पादक ते विक्रेता बनण्याची वेळ आली आहे. त्यातही कोरोनाचे कारण पुढे करून मुंबई महापालिकेचे कर्मचारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. तेथे माजी आमदार अनिल कदम मदतीला धावल्याने शेतकऱ्यांना ५० ते ६० रुपये किलोने द्राक्ष विकता आले.

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

माजी आमदार कदम आले मदतीला धावून 
आहेरगाव येथील शेतकरी प्रमोद साठे टेम्पोत द्राक्षांच्या पेट्या भरून दादर येथे विक्री करीत होते. त्यावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आडकाठी आणली. शेतकऱ्यांनी थेट माजी आमदार अनिल कदम यांच्याशी संपर्क साधला. श्री. कदम यांनी शिवसेना भवनात शेतकऱ्यांची व्यथा पोचवून त्या शेतकऱ्यांना तात्पुरता परवना मिळवून दिला. त्यानंतर ५० ते ६० रुपये किलोने द्राक्षविक्री झाली.