नाशिकचे सावाना महाराष्ट्रातील पहिले डिजिटल वाचनालय

www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील सर्वांत जुने नाशिक सार्वजिनक वाचनालय हे वाचकांचे माहेरघर आहे. आजवर अनेक लेखक साहित्यिक वाचनालयामुळे घडलेले आहेत. १८४० मध्ये स्थापन झालेली सार्वजनिक वाचनालय ही संस्था आता कात टाकत असून, महाराष्ट्रातील पहिले डिजिटल वाचनालय ठरले आहे.

महाराष्ट्रातील सार्वजिनक वाचनालय ही पहिली संस्था आहे जिने सभासद वाचक तसेच वाचन संस्कृती वाढावी म्हणून वाचकांना पुस्तकांची सर्व माहिती घरबसल्या देण्यास सुरुवात केली आहे. एसएमएस, व्हॉटस ॲपवर मिळालेल्या लिंकवर क्लिक केल्यावर वाचनालयात कोणत्या लेखकाची किती पुस्तके उपलब्ध आहेत कोणते पुस्तक उपलब्ध नाही, प्रकाशक, लेखक याची सर्व माहिती मिळते. एक लाख ४२ हजारांहून अधिक पुस्तकांची यादी एका लिंकवर मिळत असून, तिचे उद्घाटन अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले होते. आधुनिकीकरणाचा हा पहिला टप्पा असून, पुस्तकांचे आरक्षण हा दुसरा टप्पा असणार आहे. सावानातील अनेक वाचक सभासदांचे मोबाइल क्रमांक बदलले असून, त्यांच्यापर्यंत ही माहिती/लिंक पोहोचायला अडचण निर्माण होत आहे. तरी ज्या वाचक सभासदांचे मोबाइल नंबर बदलले आहेत त्यांनी ते वाचनालयात जाऊन अपडेट करून घ्यावेत किंवा अधिक माहितीसाठी सभासद हाेण्यासाठी व यादी पाहण्यासाठी ८६६८५२०१०७/८६०५६०३००२/८६६८५०२५६२ या क्रमांकावर संपर्क साधावा. https://savana.org.in/opac या लिंकवर क्लिक केल्यावर शीर्षक, लेखक, प्रकाशक, भाषा, कपाट क्रमांक अशी सर्व माहिती वाचकांना मिळते.

सावानाचे वाचक सभासद वाढण्यासाठी तसेच त्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी सावानातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्यासाठी ही एसएमएस सुविधा वाचकांसाठी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सावाना हे पहिले वाचनालय आहे ज्यांनी ही सुविधा वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

– वैद्य विक्रांत जाधव (उपाध्यक्ष, सावाना)

जागरूकतेची गरज…

नुकतीच सुरू झालेली ही सुविधा ज्येष्ठ वाचकांसाठी जिकिरीची असू शकते, पण एकदा लिंकवर क्लिक केल्यावर काही अक्षरे मराठी/इंग्रजीत टाकल्यावर लगेचच पुस्तकांची सर्व माहिती उपलब्ध होते. यामुळे वाचनालयापर्यंत येण्याचे कष्ट वाचून घरबसल्या पुस्तकांची सर्व माहिती मिळते.

हेही वाचा :

The post नाशिकचे सावाना महाराष्ट्रातील पहिले डिजिटल वाचनालय appeared first on पुढारी.