नाशिकच्या अलिशान हॉटेलमध्ये तरुणाईचा धिंगाणा! पोलिसांच्या नाकावर टिच्चून पार्टी

सातपूर (नाशिक) : नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, त्र्यंबक रस्त्यावरील सातपूर पोलिसांच्या नाकावर टिच्चून एका आलिशान हॉटेलमधील पार्टीत तरुण, तरुणी विनामास्क धिंगाणा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत प्रशासन काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. 

पोलिसांच्या नाकावर टिच्चून पार्टी
दरम्यान, जिल्हाभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शहरातील शाळा व महाविद्यालये १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. औद्योगिक वसाहती बंद होऊन गरीब कामगारांचा रोजगार जाऊ नये, म्हणून काळजी घेण्याचा सूचना सर्व आस्थापनांना दिल्या आहेत. मात्र, या सूचना श्रीमंतांची भावी पिढी मानायला तयार नाही. सातपूर पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये हुक्का व मद्य पार्टी करत काही रईसजाद्यांनी धिंगाणा घातला. नशेत बाहेर येऊन भरधाव गाडी चालवत रायडिंग केली व रस्त्यावरील वाहनांना कट मारण्याचे प्रकारही समोर आले.

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

त्र्यंबक रस्त्यावरील हॉटेलमध्ये तरुणाईचा धिंगाणा 

विशेष म्हणजे या पार्टीत एकानेही मास्क घातला नव्हता. एरवी सर्वसामान्य नागरिक विनामास्क आढळून आला अथवा विनाहेल्मेट दिसला तर त्याच्यावर कारवाई केली जाते. मग पोलिसांच्या नाकावर टिच्चून पार्टीचे आयोजन करणारे व हॉटेल प्रशासनावर कारवाई होईल का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा