नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतरही महायुतीतील उमेदवारीचा पेच कायम राहिला आहे. उमेदवारीसाठी आता भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली असून ठाण्याच्या बदल्यात नाशिकची मागणी केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व उबाठाचे जिल्हा संघटक विजय करंजकर यांनी मुंबई गाठत उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भाजपच्या दाव्यानंतर आता महायुतीच्या उमेदवारीबाबत ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची पसंतीही निर्णायक ठरणार आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी मतदारसंघात प्रचाराचा एक टप्पा पूर्ण केल्यानंतरही महायुतीचा उमेदवार निश्चित होऊ शकलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पसंती असूनही केवळ उमेदवारीच्या घोषणेला होत असलेल्या विलंबामुळे छगन भुजबळ यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. यामुळे महायुतीतील उमेदवारी निश्चितीचा वाद कमी होण्याऐवजी अधिकच वाढला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून अद्याप उमेदवारीचा निर्णय घोषित होऊ शकलेला नाही. ठाकरे गटाने नाकारलेल्या विजय करंजकर यांचे नावही आता उमेदवारीसाठी चर्चेत आले आहे. त्यामुळे इच्छूकांनी मुंबई गाठत उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केली आहे. दरम्यान, महायुतीच्या उमेदवारीचा निर्णय २५ एप्रिल रोजी जाहीर केला जाईल, असे सांगितले जात आहे.
समता परिषदेची आज बैठक
भुजबळांच्या उमेदवारीसाठी ओबीसी समाजापाठोपाठ आता महात्मा फुले समता परिषदनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक यांनी मंगळवारी(दि.२३) सकाळी ११ वाजता भुजबळ फार्म येथे बैठक बोलविली आहे. या बैठकीचा विषय जाहीर करण्यात आला नसला तरी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलविण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.