नाशिकच्या काझीगढीप्रश्नी नुसतेच ढोल ; रहिवाशांचा जीव ‘मातीमोल’; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतरही प्रशासन सुस्तच

काझीगढी नाशिक,www.pudhari.news

नाशिक : सतीश डोंगरे

२१ नोव्हेंबर २०१३ चा दिवस काझीगढीवासीयांच्या काळजाचा ठोका चुकावणारा होता. गढीचा एक भाग कोसळून २५ कुटुंब रस्त्यावर आले होते. यात २० जण जखमी झाले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, रहिवासी तसेच प्रशासनासाठी हा संकेत होता. त्यानंतर महाराष्ट्रात माळीणसह अनेक घटना घडल्या. इर्शाळवाडीची आणखी एक दुर्घटना त्यात जोडली गेली. मात्र, काझीगढीबाबत प्रशासनाचा सुस्तपणा कमी झाल्याचे अजूनही दिसून येत नाही. प्रशासनाकडून केवळ नोटिसांचा सोपस्कार पार पाडण्यावर भर दिला जात असल्याने काझीगढीवासीयांच्या जीवाचे ‘मोल’ काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

२० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या काझीगढीवर अत्यंत धोकादायक स्थितीत वास्तव्यास आहे. गोदाकाठालगत १०० फूट उंचीचा असलेल्या या गढीचा ढिगारा दरवर्षी ढासळतो. त्यामुळे दर पावसाळ्यात गढीचा भाग ढासळून एक-एक घराचा मातीचा ढिगारा होत आहे. त्यामुळे गढीच्या संरक्षक भिंतीसह इतर उपाययोजना तातडीने करण्याची गरज आहे. रहिवाशांचे स्थलांतरही गरजेचे आहे. मात्र, महापालिका प्रशासनासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याने, काझीगढीवरील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. यंत्रणांच्या या वेळकाढूपणात काझीगढीचा पाया हळूहळू खचत असून, गढीलगतचे घरे जमीनदोस्त होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे रहिवाशांनी केलेल्या संरक्षक भिंत बांधण्याबाबत अद्यापही कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. महापालिकेने संरक्षक भिंतीसाठी फाइल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली. तेथून ती पुन्हा महापालिकेत आली. मात्र, त्यानंतर फाइलचे काय झाले ही बाब गुलदस्त्यात आहे. अशात काझीगढीबाबत दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

१५० घरे, २०० कुटुंब, २० हजार रहिवासी

१०० वर्षांचा करार संपला

राज्य शासनाने नसरवानजी जमशेटजी बलसारा पारशी यांना २५ जून १९१७ ते २४ मे २०१६ पर्यंत काझीगढी एका करारावर दिली होती. हा करार मे २०१६ मध्येच संपुष्टात आला आहे. त्यामुळे शासनाने काझीगढीची स्वतःची मिळकत ताब्यात घेऊन या ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे अपेक्षित आहे. मात्र, संरक्षक भिंतीची फाइलच लालफितीत अडकल्याने, गढीचा धोका आणखीनच वाढला आहे.

घरकुलाला नकार

काझीगढीवरील रहिवाशांसाठी महापालिकेच्या माध्यमातून घरकुल योजना राबविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तत्कालीन महापौर अशोक मुर्तडक यांनी याबाबतची घोषणा केली होती. मात्र, गढीवरील एका घरात तीन ते चार कुटुंबे राहतात. तर घरकुल योजनेत एकाच कुटुंबाला घर मिळणार असल्याने, इतरांनी कुठे जावे असा सवाल स्थानिकांनी उपस्थितीत करीत घरकुलांना नकार दिला होता.

दरवर्षीच येतो पावसाळा

सुमारे १५० घरे आणि २० हजारांपेक्षा अधिक रहिवासी असलेल्या काझीगढीबाबत प्रशासन ढिम्म असून, ‘दरवर्षीच येतो पावसाळा’ या भूमिकेत प्रशासन आहे. नगर विभाग आणि बांधकाम विभागाकडून नोटिसा सोपस्कार पार पाडल्या जात असल्याने, गढीवरील रहिवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

काझीगढीचा इतिहास

सर्व फोटो : हेमंत घोरपडे

गोदावरी नदीच्या तीरावरील नाशिक शहरातील पहिला रहिवासी म्हणून काझीगढीची ओळख आहे. मौर्य, सातवाहन साम्राज्याच्या अनेक पाऊलखुणा या गढीच्या उदरात लपलेल्या आहेत. मुघल आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाची ही गढी साक्षीदार आहे. इसवी सन पूर्व १५०० ते ५०० या ताम्रपाषाण युगातील माणूस या गढीवर राहिल्याचे अनेक पुरावे उत्खननातून मिळाले आहेत. ब्रिटिश संशोधक जॉन मार्शल यांनी १९०२ साली केलेल्या संशोधनानंतर या गढीचे राष्ट्रीय संरक्षक स्मारक म्हणून जतन करण्याचा निर्णय झाला. १९४९ साली पुरातत्त्व विभागाने तो जाहीर केला. कालांतराने इतिहासाचा हा वैभवशाली ठेवा असलेल्या काझीगढीची नोंद कागदावरच राहिली.

हेही वाचा :

The post नाशिकच्या काझीगढीप्रश्नी नुसतेच ढोल ; रहिवाशांचा जीव 'मातीमोल'; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतरही प्रशासन सुस्तच appeared first on पुढारी.