नाशिकच्या कोणार्कनगरमधून सहा मुलांचे अपहरण झाल्याचा मेसेज व्हायरल

अपहरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाल्यानंतर शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये अपहरणाचे गुन्हे दाखल केले जातात. मात्र, काही अतिउत्साही नागरिकांकडून कोणतीही खातरजमा न करता ‘कोणार्कनगरमधून सहा मुलांचे अपहरण’ अशा आशयाचे चुकीचे मेसेज व्हायरल करून अफवा पसरवत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्याचा फटका इतर सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कपडे विक्रेत्यांनाही नागरिकांनी अपहरणकर्ते समजून चोप दिल्याची घटना घडली आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे सण-उत्सव-नियमित कामकाजही पूर्वपदावर आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढली आहे. शहरातील अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, त्या प्रकरणी अपहरणाचे गुन्हे दाखल करून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. त्यापैकी अनेक मुले-मुली सापडले असून रागाच्या भरात, प्रेमाच्या आमिषाला बळी पडून किंवा इतर कारणांनी मुला-मुलींनी पालकांना न सांगता घर सोडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सोशल मीडियामुळे राज्यभरात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. या मेसेजची शहानिशा न करता अनेक जण चर्चा करीत असून, काही घटनांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना मुले चोरणारे समजून नागरिकांकडून चोप दिल्याच्या घटना घडल्या आहेत.

नाशिकमध्येही उपनगर परिसरात याच गैरसमजातून नागरिकांनी कापडविक्रेत्यांना मारहाण केली होती. त्यामुळे हे प्रकार घडत असल्याने अफवा न पसरवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तरीदेखील काही नागरिकांकडून त्यात काही नामवंत व्यक्तीही बातमीची, घटनेची शहानिशा न करता चुकीचे मेसेज पाठवले जात आहे. त्यामुळे अफवांना बळ मिळत असल्याचे चित्र आहे. नुकतेच सहा मुलांचे अपहरण झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या मेसेजमध्ये ‘अलर्ट… कोणार्कनगरातून सहा मुलांचे अपहरण. लहान मुलांना सांभाळा’ असा आशय असून, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ—मावस्थेसोबत भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत पोलिसांना विचारल्यावर असा प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे काही अतिउत्साही नागरिकांच्या सोशल मीडियावरील मेसेजमुळे पुन्हा चुकीची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अफवा, चुकीचे मेसेज व्हायरल करणार्‍यांना पोलिसांनी समज देण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या कोणार्कनगरमधून सहा मुलांचे अपहरण झाल्याचा मेसेज व्हायरल appeared first on पुढारी.