नाशिकच्या गोविंदनगरला एकाच वेळी ५ इमारती सील; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : ज्या भागात शहरातील पहिला कोरोना रुग्ण आढळून आला, त्याच गोविंदनगर भागात शुक्रवारी (ता.१८) पाच इमारतींत २४ कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महापालिकेने तातडीने इमारती प्रतिबंधित जाहीर केल्या असून, चौदा दिवस बाहेर न पडण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

सोशल मीडियावरील मेसेजने शहरात खळबळ

दरम्यान, गोविंदनगर भागात शुक्रवारी (ता. १९) कोरोनाबाधितांचे वेगळे आकडे सोशल मीडियावरून बाहेर पडल्याने शहरात खळबळ उडाली होती. वैद्यकीय विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित नसल्याचे स्पष्टीकरण दिले. शहरात कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. गोविंदनगर भागातील वाढत्या संख्येचे लक्ष्य आज पुन्हा या भागाकडे गेले. गेल्या वर्षी ६ एप्रिलला या भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने तीन किलोमीटरचा परिसर पंधरा दिवसांसाठी सील करण्यात आला होता.

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

रॅपिड ॲन्टिजेन व आरटीपीसीआर चाचणी

पहिल्या कोरोनाच्या रुग्णामुळे हा भाग चर्चेत आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकाच दिवशी शेजारच्या इमारतींत २४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पुन्हा गोविंदनगर भागाकडे लक्ष केंद्रित झाले आहे. दहा ते बारा दिवसांपासून या भागात रुग्ण वाढत आहे. २४ रुग्ण बाधित असले तरी त्यातील तीन रुग्णांनी उपचार घेऊन बरे झाल्याने २१ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. तातडीचा उपाय म्हणून महापालिकेने या भागातील ८५ नागरिकांची रॅपिड ॲन्टिजेन व आरटीपीसीआर चाचणी केली आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

सत्यम स्वीटस परिसर हॉटस्पॉट 
गोविंदनगरातील सत्यम स्वीटस परिसरातील स्वस्तिश्री अपार्टमेंट, शारदा निकेतन अपार्टमेंट, शीतल पॅराडाईज, अशोक प्राइड, वेदाज स्पेस या तीन अपार्टमेंटमध्ये २४ नागरिक बाधित आढळले आहेत. परिसरातील अपार्टमेंटचा भाग महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना चौदा दिवस घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. नागरिकांना औषधपुरवठा केला जात असून, या भागात औषधफवारणी करण्यात आली आहे. 

अफवांचा पाऊस 
दरम्यान, सोशल मीडियावरून या भागात प्रथम ५६, त्यानंतर दीडशे व सायंकाळी सव्वादोनशे पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची अफवा पसरली होती. परंतु महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने अफवा असल्याचे सांगितले.