नाशिकच्या घड्याळांची देशात टिक टिक! छिंदवाडा विद्यापीठामध्येही उभारले ‘गार्डन क्लॉक’

नाशिक : देशातील अनेक ठिकाणांवर असलेली ‘टॉवर क्लॉक’ ही ‘मेड इन नाशिक’ आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील रायसोनी विद्यापीठात १६ फूट बाय १६ फूट आकाराचे ‘गार्डन क्लॉक’ बसविले आहे. त्याच्या दोन्ही काट्यांचेच वजन १८ किलो आहे. याअगोदर नोएडाच्या दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये सर्वांत मोठे चौदा फूट व्यासाचे आणि तीन डायल असलेले टॉवर क्लॉक उभारले आहे. ही घड्याळे तयार करताहेत, गणेश वॉचचे संचालक विजय खडके. 

छिंदवाडा विद्यापीठामध्ये उभारले ‘गार्डन क्लॉक’ 

नाशिकमधील टॉवर क्लॉक आहेत ती खडके यांनी तयार केली आहेत. शिवाय ब्रिटिशकालीन टॉवर क्लॉकचे नूतनीकरण त्यांनी केले आहे. त्यामध्ये मेन रोडच्या महापालिकेची जुना इमारत, रामकुंड वस्त्रांतरगृह, के. के. वाघ महाविद्यालय, अभिनव शाळा, पोलिस अकादमी, फ्रावशी अकादमी, बांधकाम भवन, सपकाळ नॉलेज, संदीप फाउंडेशन, विज्डम हाय स्कूल, बी.वाय.के. महाविद्यालय इमारतीवर टॉवर क्लॉकचा समावेश आहे. खडके १९५७ पासून घड्याळे बनविण्याचे व दुरुस्तीचे काम करीत आहेत. वडिलांपासून त्यांना त्याबद्दलचे बाळकडू मिळाले. सुरवातीस चावीचे मनगटी, गजराचे, भिंतीवरचे घड्याळ दुरुस्ती केली. १९७५ मध्ये नाशिकमधील औद्योगीकरणास सुरवात झाल्यानंतर कामगारांचे हजेरी घड्याळ (पंचिंग क्लॉक) विक्री व दुरुस्ती सुरू झाली. लहानपणापासून घड्याळाविषयी कुतूहल व आवड असल्याने दुरुस्ती करत असताना वेगवेगळ्या घड्याळांची निर्मिती होऊ लागली. ब्रिटिशकालीन चावीचे व वजनावर चालणाऱ्या घड्याळांच्या दुरुस्तीची मागणी वाढली. त्याचबरोबर सहाय्यक टेक्निशियन घडत गेले. त्यात सहाय्यक सुनील चौधरी व राहुल चौधरी तरबेज झाले आहेत. यात १० ते १२ जण काम करीत आहेत. 

मुंबईकरांनाही ‘टॉवर क्लॉक’ची भुरळ 

नवीन तंत्रज्ञान आल्यावर चावीचे यंत्र कालबाह्य झाले. इलेक्ट्रिकल आणि बॅटरीवर चालणारे यंत्र तयार केले. सध्या चालणाऱ्या टॉवर क्लॉकपैकी बहुतांशी इलेक्ट्रिकल आहेत. मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटवर १०० फूट उंचीवरील सात फूट व्यासाचे आणि चार डायलचे घड्याळ चार वर्षांपूर्वी श्री. खडके यांनी उभारले. चेंबूर येथील हिंदुस्थान रिफायनरी, दादरचे डिसिल्व्हा स्कूल, गोरेगावचे जोसेफ स्कूल, भायखळ्याचे मेरी स्कूल अशी त्यांची टॉवर क्लॉक कार्यरत आहेत. 

Image may contain: sky and outdoor

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा

देशभरात टॉवर क्लॉक 

सिमला येथील चर्चसह जुनागड, राजकोट, बडोदा, सुरत, खरोड (गुजरात), अजमेर, भरतपूर, अलवार, भिलवाडा, सिकर (राजस्थान) लुधियाना, जालंदर, अभोर, बुचीमंडी, पठाणकोट, मरेलकोटला (पंजाब), यमुनानगर, हल्दवाणी (उत्तराखंड), बरेली, कानकेर, दंतेवाडा (छत्तीसगड), बेळगाव, गुलबर्गा, हुबळी, तिरुअनंतपुरम, पालक्ककोट, मंगलोर, बेंगळुरू, गुवाहाटी, डिमापूर (नागालँड), झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, हिमाचल प्रदेश, श्रीनगरमधील लाल चौक, गोवा आदी टॉवर क्लॉक विजय खडके यांनी उभारले आहेत. याशिवाय महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड, रत्नागिरी, सावंतवाडी, वेंगुर्ला, पाचगणी, वर्धा, नागपूर, गोंदिया, अकोला येथेही त्यांनीच टॉवर क्लॉक बसविले आहेत. 

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना