नाशिकच्या चित्रकाराचे मुंबईकर झाले फॅन; प्रशासकीय कार्यालयासाठी चित्राची निवड

इंदिरानगर (नाशिक) : प्रख्यात चित्रकार राजेश सावंत यांनी काढलेल्या चित्राची मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रशासकीय इमारतीत लावण्यासाठी निवड झाली. नरिमन पॉइंट (मुंबई) येथील स्टेट बँकेच्या १९ मजली प्रशासकीय इमारतीच्या अठराव्या मजल्यावर संचालक मंडळ आणि अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीच्या सभागृहात हे चित्र लावले आहे.

चित्रकार निवडीपासून ते चित्र लावेपर्यंतचा हा प्रवास

सोशल मीडियाद्वारे चित्रकार निवडीपासून ते चित्र लावेपर्यंतचा हा प्रवास झाला. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित चित्रासाठी भारतातील चित्रकारांचा यू-ट्यूब ,फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शोध सुरू केला. त्यात सावंत यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क साधण्यात आला. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या चित्रांची आणि त्यांच्या चित्रकला शैलीची माहिती व्हॉट्सअपद्वारे मागविल्यानंतर त्यांना या चित्राबाबत विचारण्यात आले. चित्रांची संकल्पना हिमालयाच्या उंचीप्रमाणे स्टेट बँक प्रगतीची उंची गाठत आहे.

चित्राचे लवकरच अनावरण होणार

सर्वांगाने देशाच्या समृद्धीत बँकेचा सिंहाचा वाटा आहे. या बाबी अधोरेखित होण्यासाठी मुंबईत बसून हिमालयाचे दर्शन व्हावे, अशी चित्रासाठी संकल्पना ठरविली गेली. त्यानुसार सावंत यांनी इंदिरानगरच्या स्टुडिओत एका महिन्यात सहा फूट रुंद आणि पाच फूट उंच असे ‘ॲक्रेलिक ऑन कॅनव्हास’ या पद्धतीने हे चित्र साकारले. शनिवारी (ता.२८) दुपारी हे चित्र इमारतीत लावले आहे. चित्राचे लवकरच अनावरण होणार आहे.

जागतिक दर्जाच्या बँकेच्या मुख्य सभागृहात मी काढलेले चित्र लावले गेले, हा मोठा बहुमान आहे. यानिमित्ताने नाशिक शहरात जन्मलेली कलाकृती जागतिक पातळीवर गेल्याने आनंदी आहे. - राजेश सावंत (चित्रकार)