पुढारी ऑनलाइन डेस्क – शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी आज (दि. 28) जाहीर करण्यात आली आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या 8 उमेदवारांच्या नावांची घोषणा या यादीतून करण्यात आली आहे. दरम्यान, महायुतीत नाशिकची जागा ही शिंदे गटाच्या वाटेला आलेली असल्याने आज नाशिकच्या जागेची घोषणा होणे अपेक्षित होते, मात्र या यादीत नाशिकच्या जागेचा समावेश करण्यात न आल्याने नाशिकचा तिढा कायम आहे. त्यामुळे नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार हेमंत गोडसेंना वेटींगवरच ठेवण्यात आले आहे. नाशिकसह कल्याण, यवतमाळ, वाशिम येथील उमेदवारांचेही या यादीत नाव जाहीर झालेली नाही. श्रीकांत शिंदे यांचेही नाव या यादीत घेण्यात आलेले नाही.
महायुतीकडून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा तीनही पक्षाकडून नाशिकच्या जागेवर दावा करण्यात येतो आहे. शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे छगन भुजबळ या दोघांची नावे या जागेसाठी अधिक चर्चेत आहे. नाशिकची जागा आपल्यालाच मिळावी यासाठी हेमंत गोडसे आग्रही असून त्यासाठी त्यांनी दोन वेळा मुंबई गाठत मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेटही घेतली. मात्र, शक्ती प्रदर्शन करत दबाव निर्माण करुनही गोडसे यांना अद्याप वेटींगवरच ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे, साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी मागणी छगन भुजबळांनी लावून धरली आहे.
त्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर, महाविकास आघाडीकडून या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून उमेदवारीची दुसरी यादी शुक्रवारी(दि.२९) जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यात नाशिकच्या उमेदवाराचा समावेश असेल. त्यात ही उमेदवारी कुणाला मिळेल याची उत्सुकता आहे.
या 8 उमेदवारांची घोषणा
राहुल शेवाळे – मुंबई दक्षिण मध्य
संजय मंडलीक – कोल्हापूर
सदाशिव लोखंडे – शिर्डी (अनुसूचित जाती)
प्रतापराव जाधव – बुलढाणा
हेमंत पाटील – हिंगोली
श्रीरंग बारणे – मावळ
राजू पारवे – रामटेक (अनुसूचित जाती)
धैर्यशिल माने – हातकणंगले
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी#Shivsena pic.twitter.com/PGgRhVMrhK
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) March 28, 2024
The post नाशिकच्या जागेचा तिढा कायम, हेमंत गोडसे वेटींगवरच appeared first on पुढारी.