Site icon

नाशिकच्या देवळालीत साकारतेय बिनखांबाचे दोन मजली जैन मंदिर

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा

येथील लॅम रोड बालगृह रोडवर तीस हजार चौरस फूट जागेत २४ तीर्थंकाराचे दर्शन एकाच छताखाली होणार असून, बिनखांबाचे दोनमजली असे भव्यदिव्य जैन मंदिर साकारले असून, देशातील पहिले जैन मंदिर असल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्त मंडळाने दिली. येत्या शुक्रवार (दि. 24)पासून प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे.

लॅम रोड परिसरात जैन बांधवांची वसाहत मोठ्या प्रमाणावर असून, मंदिरेही आहेत. मुंबईस्थित गुणोपासक परिवार ट्रस्टने जैन आध्यात्मिक योगी संत आचार्य कलापूर्णम सुरीश्वरजी महाराज यांच्या आशीर्वादाने व प्रवचनकार आचार्य तत्त्वदर्शन महाराज यांच्या प्रेरणेने ८१ बाय ८१ असे ६५६१ फूट बिनखांबाचे भव्यदिव्य दोनमजली मंदिर उभारण्याचे काम सुरू केलेले आहे. एक लाख टनांपेक्षा जास्त आकाराच्या संगमरवरी दगडात नक्षीकाम केलेले कलापूर्णम तीर्थधाम साकारले जात आहे. या मंदिरांसाठी गेल्या दहा वर्षांपासून १५० ते २०० कारागीर काम करत आहेत.

छतावर साकारलेले नक्षीकाम अनोखे असून, ते कुठेही वापरण्यात आलेले नाही. मुख्य गाभाऱ्यात मुनिसुरत स्वामींची मूर्ती असून ३६० अंशांमध्ये २३ तीर्थंकारांचे दर्शन होणार आहे. येत्या शुक्रवारपासून २४ ते ३ मार्चपर्यंत अंजनशलका प्रतिष्ठा महोत्सव (प्राणप्रतिष्ठा) सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जैन साध्वी महाराज यांच्यासह देश-विदेशातून ३० ते ३५ हजार जैन बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली आहे.

The post नाशिकच्या देवळालीत साकारतेय बिनखांबाचे दोन मजली जैन मंदिर appeared first on पुढारी.

Exit mobile version